औरंगाबाद - औरंगाबादला लवकरच डिजिटल सुरक्षा मिळणार आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत तब्बल 750 कॅमेरे सज्ज होणार असून, पोलिसांसह महानगर पालिकेला या कॅमेऱ्यांचा फायदा होणार आहे. अशी महिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम यांनी दिली.
120 कॅमेरे झाले कार्यान्वित
औरंगाबाद शहरात डिजिटल क्रांतिला सुरुवात झाली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले असून, यामध्ये महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे. एकूण 700 कॅमेरे शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवणार असून, त्यामध्ये 600 स्थिर तर 100 हलणारे कॅमेरे टप्प्याटप्याने कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यासाठी 80 ते 90 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यापैकी 120 कॅमेरे कार्यान्वित झाले असून, त्याद्वारे काही मुख्य रस्त्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पुढील काही महिन्यांत पूर्ण यंत्रणा कार्यान्वित होईल अशी माहिती पुष्कल शिवम यांनी दिली.
यापूर्वी देखील बसवण्यात आले होते 50 कॅमेरे
औरंगाबाद शहरात सेफ सिटी अंतर्गत 50 कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र कॅमेरे बसवत असताना त्याची वायरिंग विद्युत खांबावरून टाकण्यात आली. त्यामुळे अनेक वेळा वायर तुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे बऱ्याचवेळा कॅमेरे बंद असल्याच्या तक्रारी समोर आल्या. मात्र स्मार्ट सिटी अंतर्गत 700 कॅमेरे बसवत असताना सेफसीटी अंतर्गत लावण्यात आलेले 50 कॅमेरे देखील त्यात वापरण्यात येणार असल्याने, एकूण 750 कॅमेरे कार्यान्वित असणार आहे. या सीसीटीव्हचा पोलिसांना शहरात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी उपयोग होणार आहे.
ध्वनी आणि वायू प्रदूषणाची देणार माहिती
स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून, त्याची यंत्रणा पोलीस आयुक्त कार्यालय आणि मनपा स्मार्ट सिटी कार्यालयातून नियंत्रित होणार आहे. कॅमेऱ्यांसोबत शहरातील वर्दळीच्या ठिकाणी ध्वनी आणि वायू प्रदूषणाची माहिती देणारी यंत्रणा देखील विकसीत करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या योजनांना पुढील चार ते पाच वर्ष निधी कमी पडणार नाही. अशी व्यवस्था मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी केली असून, त्यातून शहरासाठी अनेक चांगले उपक्रम राबवण्यात येत आहेत. अशी माहिती पुष्कल शिवम यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्टसिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम यांच्याशी विशेष बातचीत केली आहे. ईटीव्हीचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.