अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळका पटाचे गावात तार कंपाउंड करण्यात आले होते. हे तार कंपाउंड करणाऱ्या कामगारांच्या मजुरीच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी दीड हजार रुपये लाच मागितल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लाच मागणाऱ्या जळका पटाचे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सोनाली संजय पिलारे यांच्यासह पती संजय पिल्लारे व भाचा विजय पिल्लारे यांना अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
सही करण्यासाठी केली लाचेची मागणी -
तक्रारदार मजुरांनी गावातील तार कंपाउंड व नालीचे बांधकाम मार्च 2021 मध्ये पूर्ण केले होते. या कामाच्या मजुरीचा 22 हजार 700 रुपयांचा धनादेश सेंट्रल बँकेत तक्रारदाराच्या नावे मंजूर झाला होता. या धनादेशावर ग्रामसेवकाची सही झाली होती. मात्र, सरपंचाची सही यात बाकी होती. सरपंच महिलेने धनादेशावर सही करण्यासाठी दीड हजार रुपयाची लाचेची मागणी तक्रारदारांकडे केली होती.
तिघांना अटक -
कामगारांच्या मजुरीचा धनादेश हा सरपंचाने स्वतः जवळच ठेवला होता. दरम्यान, तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पंचासमक्ष लाच घेतल्याचे सिद्ध झाल्याने महिला सरपंचासह पती आणि भासरा यांच्याविरुद्ध तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - 100 कोटींची खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीनचिट ? सीबीआयकडून मोठा खुलासा