अमरावती - अमरावती-नागपूर महामार्गावर नांदगाव पेठ येथे असणाऱ्या टोलनाक्याविरोधात आंदोलन पेटले आहे. या टोल नाक्याद्वारे वरुड-मोर्शीसह या भागातील अनेक गावकऱ्यांकडून विनाकारण टोल वसुली केली जात आहे. या टोल नाक्याला गेल्या पाच वर्षांपासून विरोध होत आहे. हा टोलनाका अवैध असल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. तरी देखील या टोल नाक्यावरून नागरिकांची आर्थीक लूट होत आहे. याविरोधात 25 जानेवारी पर्यंत विविध आंदोलन केले जाणार असून 25 ला टोल नाका फोडण्याचा इशारा, टोलमुक्ती कृती समितीने दिला आहे.
नांदगाव पेठ येथील टोलनाक्यामुळे ज्या ग्रामस्थांची आर्थिक लूट होत आहे. त्या गावातील लोक 8 जानेवारीला संबंधित पोलीस ठाण्यात एकाचवेळी तक्रार देणार आहेत. नांदगाव पेठ, माहुली जहागीर, मोर्शी, बेनोडा, वरुड, शंदुर्जना घाट, या सर्व पोलीस ठाण्यात टोल नाका चालविणाऱ्या आयआरबी कंपनी विरोधात तक्रार दिली जाणार आहे.
नितीन गडकरींच्या कार्यल्यासमोर आंदोलन-
हा टोल नाक अनधिकृत असल्याचे स्पष्ट करून हा टोलनाका त्वरित बंद करू, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. मात्र दिलेल्या आश्वानाची पूर्ती नितीन गडकरी यांनी केली नसल्याने 16 जानेवारीला नागपूरच्या रामनगर येथील कार्यल्यासमोर टोलमुक्ती कृती समिती आंदोलन करणार आहे.
प्रत्येक गावात आंदोलनाचा प्रचार-
18 जानेवारीला टोल नाक्यावर सांकेतिक आंदोलन केले जाणार आहे. 22 जानेवारीला टोल नाक्यामुळे आर्थिक लूट होत असणाऱ्या गावांमध्ये आंदोलनासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे.
25 जानेवारीला निर्णायक आंदोलन-
शांततेच्या मार्गाने आंदोलन केल्यावरही टोलनाका कायम राहत असेल तर 25 जानेवारीला निर्णयाक आंदोलन होईल, असे शिवसेनेचे प्रदीप बाजाड यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- शहरांची नावे बदलून वातावरण दुषित करू नका; थोरातांनी पुन्हा ठणकावले