अमरावती - लॉकडाऊन काळात प्रवास करणाऱ्या लाखो मजुरांना व गोरगरिबांना सलग अडीच महिन्यांपासून अन्नदान करणाऱ्या अमरावतीच्या 'वऱ्हाड' संस्थेचे आता लग्न करणाऱ्या गोरगरिबांसाठी नवा उपक्रम सुरू केला आहे. या नवीन उपक्रमाअंतर्गत वऱ्हाड संस्था सामाजिक अंतर ठेवून गोरगरीब मुला-मुलींचे लग्न लावून देत आहे. तसेच सर्व खर्चही वऱ्हाड संस्था करत आहे.
देशात लॉकडाऊन असल्याने सर्व काम बंद आहे. त्यामुळे नागरिकांजवळ पैसा नाही. दरम्यान, लॉकडाऊन आधी ज्या मुला-मुलींचे लग्न जुळले, अशापैकी आता अनेकांजवळ पैसा नाही. अशा परिस्थितीत लग्न करावे कसे? अशी चिंता असलेल्या वर-वधूंसाठी वऱ्हाड संस्थेने पुढाकार घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात लाखो मजुरांना, लोकांना मोफत जेवण देणाऱ्या या संस्थेने आता गोरगरिबांची लग्न लावण्याची तयारी दर्शवली आहे.
त्यासाठी फक्त वधू आणि वराने संस्थेच्या ठिकाणी यावे लागणार आहे. तिथे येऊन मग छोटेखाणी लग्नाचा सर्व खर्च वऱ्हाड संस्था करणार आहे. आजपासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून, आज एक विवाह याठिकाणी पार पडला आहे. वऱ्हाड संस्था ही लोकांच्या मदतीसाठी सातत्याने काम करते. आधी मजुरांना जेवण आणि आता गोरगरीब मुला-मुलींचे विवाह लावून देण्याचे काम ही संस्था करत आहे.