अमरावती - अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे ( NIA raids at various places in Amravati ) हत्या प्रकरणातील सातही आरोपींना एनआयएच्या पथकाने बुधवारी मुंबईला नेले असले तरी बुधवारी दिवसभर आणि रात्री देखील या सातही आरोपींच्या घरी 'एनआयए'ने अमरावती पोलिसांसह ( Umesh Kolhe Murder Case NIA investigation ) सर्च ऑपरेशन राबविले. यासोबतच शहरातील एकूण 13 भागांमध्ये एनआयएने धाडसत्र राबविले असून, उमेश कोल्हे ( Umesh Kolhe Murder Case ) हत्या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे एनआयए गोळा करीत आहे.
हेही वाचा - उमेश कोल्हे आणि आरोपी युसुफमध्ये होती मैत्री, आर्थिक व्यवहारही झाला होता, आतापर्यंत 'ही' माहिती समोर
या भागात सर्च ऑपरेशन - एनआयएचे अधिकारी बुधवारी दिवसभर नागपुरी गेट पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. नागपुरी गेट आणि शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हातीपुरा, गुलिस्ता नगर, अल करीमनगर, कमेला ग्राउंड, बिलाल कॉलनी, छाया नगर, हाथीपुरा अशा विविध भागात आरोपींच्या घरासह त्यांच्या आश्रय दात्यांची झाडाझडती घेण्यात आली. हातीपुरा परिसरात काही लोकांचे बयान देखील एनआयएने नोंदविले.
रहेबर हेल्पलाईनला अर्थसहाय्य करणाऱ्यांचीही चौकशी - उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख इरफान याच्या रहेबर हेल्पलाईन या संघटनेला अर्थ पुरवठा करणारा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या ग्रुपचा जिल्हाध्यक्ष सोहेल नदी याची देखील रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केली. शेख इरफान याच्या रहेबर हेल्पलाईनला परप्रांतातून, तसेच परदेशातून अर्थ पुरवठा होतो का? तसेच कट्टरपंथीय संघटनेचा रहेबर हेल्पलाईनशी काही संबंध आहे का? याची चौकशी देखील एनआयएच्या वतीने करण्यात येत आहे.
एनआयएकडून बाळगली जात आहे प्रचंड गोपनीयता - औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील सातही आरोपींना अतिशय गोपनीयरित्या एनआयएच्या पथकाने मुंबईला नेले आहे. एनआयएच्या वतीने सध्या अमरावती शहरात एकूण पाच पथक कार्यरत असून, हे पाचही पथक अतिशय गोपनीयरित्या तपास करीत आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणामुळे अमरावती शहरात दडून असणाऱ्या कट्टरपंथीयांचा शोध एनआयए घेत असल्याची माहिती आहे.
पोलीस आयुक्तांचे आवाहन - नुपूर शर्मा यांच्या समर्थनात अमरावती शहरातील ज्या व्यक्तींनी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले असेल किंवा ज्यांनी नुपूर शर्मांच्या समर्थनात पोस्ट शेअर केली असेल अशा ज्या व्यक्तींना धमकी मिळत असेल त्यांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती यांनी केले आहे. ज्या व्यक्तींना मोबाईल फोनद्वारे धमकी मिळाली असेल अशा व्यक्तींनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ज्यांनाही कुठल्याही स्वरुपात धमकावण्याबाबत कॉल आला असेल त्यांनी न घाबरता तक्रार करावी, असे देखील पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. समाजात तेढ निर्माण होईल अशा स्वरुपाचे मेसेज शेअर करणाऱ्यांवर आता सायबर सेलची नजर राहणार आहे. अमरावती शहरात इंटरनेटद्वारे कुठल्याही प्रकारचा चुकीचा संदेश शेअर करणाऱ्याविरोधात सायबर सेल नजर ठेवणार असून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
आरोपींना शुक्रवारी एनआयए न्यायालयासमोर हजर करणार - उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सातही आरोपींना शुक्रवारी आठ जुलै रोजी मुंबईतील न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने दोन जुलै रोजी एनआयएकडे सोपविला होता. त्यामुळे, 4 जुलै रोजी सातही आरोपींचा ताबा आपल्याला मिळावा असा अर्ज एनआयएने स्थानिक न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने एनआयएचा अर्ज ग्राह्य मानून सातही आरोपींना चार दिवसांचा ट्रांजिट रिमांड मंजूर केला. बुधवारी सकाळी या सातही आरोपींची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अमरावती पोलिसांनी दिलेल्या वाहनातून मुंबईकडे हलविण्यात आले.
आठव्या आरोपीचा युद्ध स्तरावर शोध - उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आणखी आठवा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याचे नाव शमीम असे आहे. सध्या फरार असणारा शमीम याच्या अल करीम नगर येथील घराची एनआयए पथकाने झाडाझडती घेतली. मात्र, तो कुठे आहे याची माहिती अद्याप मिळाली नाही. आठ जुलैला या प्रकरणातील सर्व आरोपींना एनआयए न्यायालयासमोर हजर करायचे असल्यामुळे शमीमचा शोध युद्ध स्तरावर घेतला जात आहे.
उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा समर्थनार्थ केली होती पोस्ट : पशूंच्या औषधांचे विक्रीचे दुकान उमेश कोल्हे हे अमरावती तहसील परिसरात चालवत होते. डॉक्टर युसुफ खान हा त्यांच्याकडून नियमित औषधे खरेदी करायचा. उमेश कोल्हे यांच्यासोबत त्याची बऱ्यापैकी ओळख झाल्यामुळे कोल्हे यांनी त्याला अनेकदा आर्थिक मदत केल्याचीही माहिती समोर आली असून, त्याच्याकडे उधारीची बरीच मोठी रक्कम थकीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. असे असताना आपल्या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. डॉक्टर युनूफ खान याने उमेश कोल्हे यांनी शेअर केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून इतर ठिकाणी त्या शेअर केल्या होत्या.
असा रचला हत्येचा कट : यानंतर शेख इरफान शेख रशीद याने उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संपूर्ण कट रचला. या कटात शोएब खान, मुदलीस अहमद, आतिफ रशीद, अब्दुल तोफिक, शाहरुख पठाण आणि डॉक्टर युसुफ खान हादेखील सहभागी झाला. यानंतर उमेश कोल्हे हे आपले औषधीचे दुकान कधी उघडतात, कधी बंद करतात ते कोणत्या मार्गाने घरी जातात याची संपूर्ण माहिती शेख इरफान शेख रशीद यांनी काढली. यानंतर 21 जूनच्या रात्री साडेदहाच्या सुमारास उमेश कोल्हे हे औषधीचे दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाले.
दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी साधला डाव : उमेश कोल्हे यांच्यासोबतच दुसऱ्या दुचाकीवर त्यांचा मुलगा आणि सून हेदेखील होते. श्याम चौक परिसरातील घंटी घड्याळलगत त्यांची दुचाकी अडवून त्यांचा गळा चिरण्यात आला. उमेश कोल्हे यांच्या दुचाकीच्या मागे काही अंतरावर असणारा त्यांचा मुलगा आणि सून हे घटनास्थळी पोहचताच त्यांना उमेश कोल्हे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. उमेश कोल्हे यांच्या मुलाने परिसरातील काही व्यक्तींच्या मदतीने लगतच्या खासगी रुग्णालयात उमेश कोल्हे यांना उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कनेक्शन : नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्यांना जिवे मारण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही कनेक्शन आहे का? याचा तपास आता सुरू झाला आहे. उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल याची हत्यादेखील नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच घडली होती. यासह अमरावती शहरातील ज्या व्यक्तींनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केली त्यांना त्वरित माफी मागावी, अशी धमकी मिळाली असल्यामुळे अनेकांनी माफीदेखील मागितली आहे. शेख इरफान शेख रहीम हा एका संघटनेचा पदाधिकारी असल्याचे समोर आले असून, त्याच्या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावरून पैसा पुरवण्यात आला आहे का? याचा तपास देखील केला जाणार आहे.
हेही वाचा - उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सातही आरोपींना मुंबईत हलविले, एनआयए न्यायालयासमोर हजर करणार