अमरावती - अमरावतीतील गुलिस्ताननगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माझ्या मेहूण्यासोबत वाद का घातला, याबाबत विचारणा करायला गेलेल्या दोन जावयांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३ च्या ही घटना घडली ( Two Stabbed In Gulistannagar One Dead ) आहे. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फिरोजखान अफसरखान (३५, रा. गुलिस्तानगर) असे मृताचे नाव आहे. तर, शेख शकीर शेख जाबीर व सोहेल खान (दोघेही रा. गुलिस्तानगर), असे आरोपींची नावे आहेत,
नागपुरी गेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोजखानचा मेहुणा शेख जबीर शेख खलील हा त्याच्या आईला घेऊन दवाखान्यात जात असताना काही अंतरावर एक रिक्षा समोर आली. त्यामुळे शेख जबीर थांबला. त्याचवेळी आरोपी शेख शकीर शेख जाबीर व सोहेल खान हे त्याच्या मागे होते. त्यावेळी दोन्ही आरोपींनी दुचाकीसमोर काढण्याच्या कारणावरून शेख जबीरला शिवीगाळ केली. त्याच्याशी हुज्जतदेखील घातली. मात्र, वाद न घालता शेख जबीर हा तेथून आईला घेऊन दवाखान्यात गेला. काही वेळाने ही बाब शेख जबीरचा जावई फिरोजखानला समजली. आरोपी हे एकाच मोहल्ल्यातील असल्याने नेमके काय घडले याची माहिती घेण्यासाठी फिरोजखान हा साडूला घेऊन गुलिस्तानगरमध्ये पोहोचला.
दरम्यान, आरोपी हे त्याच परिसरातील एका मशिदीजवळ असल्याचे त्यांना समजले. परिसरातील एका शौचालयाजवळ फिरोजखानला दोन्ही आरोपी दिसले. त्यावेळी त्यांना विचारणा केली असता, शेख शकीर हा फिरोजखान व त्याच्या साडूच्या मागे चाकू घेऊन धावला. साडूने चाकूचा वार चुकवत तेथून पळ काढला. तर फिरोजखान हा जीव वाचवत पळत असताना शेख शकीरने त्याच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी स्थितीत फिरोजखान हा त्याच भागातील एका घराजवळ कोसळला. तेवढ्यात सोबत असलेला साडू तिथे पोहचला. त्याने दुचाकीवर फिरोजखानला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यानंतर रुग्णालयात फिरोजखानचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु असल्याची माहिती नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी दिली आहे.
हेही वाचा - Arvind Kejriwal : 'शाळा, कॉलेज देणारा पक्ष पाहिजे की दंगे घडवणारा'; केजरीवालांचा भाजपवर निशाणा