अमरावती - अमरावतीतील रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहे. यातील आरोपी तिवसा ग्रामीण रुग्णालयाचा अधीक्षक डॉ. पवन मालसुरे हा राज्याच्या महिला व बालकल्यण मंत्री यांच्या विशेष मर्जीतला असणे ही धक्कादायक बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर अनेकांची पोलखोल होऊन जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि इतर लसींच्याबाबत मोठ्या प्रमाणात सुरू असणारा भ्रष्टाचार उघडकीस येईल, असा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे.
केमद्राच्या नावाने रडगाऱ्हाणं मात्र आपल्या गावात दुर्लक्ष
रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांचे रॅकेट चालवणाऱ्यांना राजकीय मंडळींचा आशीर्वाद आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या दररोज सकाळी उठल्यापासून केंद्र सरकारच्या नावाने रडगाऱ्हाणं गात असतात. केंद्रावर आरोप करत असतात, त्याना आपल्या विधानसभा मतदारसंघात रेमडेसिवीरचा काळाबाजार आपल्या मर्जीतले लोकच करत असल्याचे माहिती नसणे यावर विश्वास बसत नाही, असेही शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले आहे.
गांभीर्याने तपास व्हावा
लोक मरत असताना या लोकांनी 600 रुपयांचे रेमडेसिवीर 12 हजार रुपयात विकले. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी ही गिधाडे आहेत. पोलिसांनी आता या प्रकरणाच्या मुळाशी जावे. या प्रकरणात नक्कीच अनेक मोठी नावे गुंतली असून मोठे गभाड हाती लागणार, असेही शिवराय कुळकर्णी यांचे यांनी सांगितले.