अमरावती - अंगात मुरलेला ताप, ( Fever in the body ) कोरडा खोकला,( Dry cough ) पोटात होणारी जळजळ, आम्लपित्त ( Bile acid ) अशा आजारांवर गुणकारी आयुर्वेदिक औषध ( Ayurvedic medicine ) असणाऱ्या पानपिंपरीचे उत्पादन ( Production of Panpimpri ) मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या अचलपूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. एका विशिष्ट पद्धतीने पानपिंपरीची शेती केली जात असून वर्षभराच्या मेहनतीनंतर शेतकऱ्यांना पानपिंपरी प्राप्त होते.
अशी केली जाते पानपिंपरीची शेती - पानपिंपरीची शेती मुख्यतः बारी समाजातील शेतकरीच करतात. शेत जमीन ट्रॅक्टरने नांगरून जमिनीची मशागत केल्यावर मजुरांच्या माध्यमातून शेतात वाफे तयार केले जातात. यानंतर बिजारोपण करून संपूर्ण शेत जमिनीचे सिंचन केले जाते. हे पीक अतिशय नाजूक असून पानपिंपरीचा वेल वरती सरळ रेषेत वाढावा यासाठी हेट्याच्या फुलांची झाड शेतात लावली जातात. एका रेषेत उंच वाढणाऱ्या या झाडाच्या आधाराने पानपिंपरीची वेल देखील सरळ रेषेत उंच वाढत जाते. हेट्याच्या झाडांना पानपिंपरीची वेल बांधण्यासाठी मेळघाटातील जंगलातून तातू अर्थात एक प्रकारचे मजबूत गवत आणले जाते. या धातूच्या साह्याने ही वेल हेट्याच्या झाडाला बांधली जाते. पानपिंपरीच्या वेलीला उन्हाळ्यात भरपूर पाणी द्यावं लागतं. पावसाळ्यात पानपिंपरीसाठी अधिक पाणी हे धोकादायक ठरतं. मार्च एप्रिल महिन्यापासून पानपिंपरीच्या शेतीला सुरुवात होते. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पानपिंपरीच्या वेलाला शेंगांसारख्या भासणाऱ्या हिरव्या रंगाच्या पिंपरी लागतात. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये या पिंपरी काळसर वेलीवरच्या ह्या पिंपरी तोडून त्यांना सुकवले जाते. पानपिंपरी जितकी जास्त चांगली असेल तितका अधिक भाव तिला मिळतो. चारशे रुपयांपासून ते बाराशे रुपये पर्यंत पान पिंपरीला अनेक आयुर्वेदिक कंपन्यांकडून मागणी असते. अशी माहिती अंजनगाव सुर्जी येथील पानपिंपरी उत्पादक शेतकरी रमेश येऊल यांनी ' ईटीव्ही भारत ' शी बोलताना दिली.
पानपिंपरीला कुलदैवतेचे महत्त्व - अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी अचलपूर, शिरजगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात पानपिंपरीचे उत्पादन घेतले जाते. पानपिंपरीची शेती प्रामुख्याने बारी समाजाच्या वतीनेच केली जाते. पानपिंपरीला बारी समाजात कुलदेवते सारखाच मान आहे. शेतात शेतकऱ्यांनी जेवण केल्यावर ते कधीही या पानपिंपरीत हात धुवत नाही. पानपिंपरीचा परिसर नेहमीच स्वच्छ ठेवला जातो. मासिक पाळी आलेल्या महिलांना पानपिंपरीच्या शेतात प्रवेश दिला जात नाही असे, अनेक नियम पानपिंपरीच्या शेतात पाळले जातात.
दिल्लीपर्यंत पानपिंपरीची मागणी - आयुर्वेदिक औषधी गुण असणाऱ्या पानपिंपरीचा उपयोग जवळपास सर्वच औषधींमध्ये केला जातो. वैद्यनाथ नागार्जुन या कंपन्यांसह रामदेव बाबांच्या आयुर्वेदिक औषधांसाठी देखील पानपिंपरीची मागणी आहे. अंजनगाव अचलपूर या ठिकाणच्या पानपिंपरीला थेट दिल्लीपर्यंत मागणी आहे.
पानपिंपरी उत्पादकांपुढील आव्हाने - सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर अंजनगाव सुरजीसह अकोला, बुलढाणा जिल्ह्यात देखील पानपिंपरीचे उत्पादन घेतले जाते. शासनाच्या वतीने पानपिंपरी साठी 2011 पासून अनुदान बंद केल्यामुळे मधल्या काळात पानपिंपरी उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले होते. 2019- 20 मध्ये शासनाकडून पानपिंपरी उत्पादकांना शासनाकडून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, पानपिंपरी उत्पादकांची परिस्थिती अद्यापही फारशी स्थिरावली नाही. देशातील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये पानपिंपरीची मागणी मोठ्या प्रमाणात असली तरी स्थानिक पातळीवर दलालांकडून पानपिंपरी उत्पादकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जाते, हे वास्तव आहे.