अमरावती - एकीकडे कोरोनामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, तर प्लाझ्मा अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू सुद्धा होत आहे. कारण गंभीर कोरोना रुग्णांना प्लाझ्माची गरज असते, तर राज्यसरकारच्या वतीने प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येत असून आज अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्लाझ्मा दान केला आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोनवेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाल्यावर त्यांच्या शरीरात अँटी बॉडीज तयार झाल्या. त्यामुळे त्यांनी प्लाझा दान करत इतरांनी सुद्धा प्लाझ्मा द्यायला पुढे यावे, असे आवाहन केले आहे. बच्चू कडू यांनी आतापर्यंत तब्बल 100 वेळा रक्तदान केले व आता 101 व्या वेळी त्यांनी आपला प्लाझ्मा दान केला आहे. आतापर्यंत सर्वाधिक वेळा रक्तदान करणारे एकमेव लोकप्रतिनिधी बच्चू कडू असल्याचे बोलल्या जाते आहे.
'आम्ही रक्त देणाऱ्यांपैकी आहोत'
आतापर्यंत आमची रक्त देण्याचीच संकल्पना राहली आहे, सध्या कोरोनामुळे प्लाझ्मासाठी अनेकांची वेटींग आहे, आणि आता माझ्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे प्लाझ्मा दान करण्याचे मला भाग्य मिळाले आहे. खरतर कुणाला हे देण्याची वेळ येऊ नये. जर दुर्दैवाने ती वेळ आलीच तर त्यांना देण्याची तयारी सहभाग असला पाहिजे. त्यातून जीव वाचवण्यासाठीच लहानसे काम आम्ही केले आहे. मला आशा आहे की, ज्याही रुग्णाला हा प्लाझ्मा मिळेल, त्याचा जीव वाचेल अशी प्रार्थना करतो. त्याचा गर्व आहे की त्याचा जीव वाचेल. आम्ही रक्त काढनाऱ्यांपैकी नाही तर रक्त देणाऱ्यांपैकी आहोत. आमच्या भूमिका हा नेहमी रक्त आणि प्लाझ्मा देणाऱ्यांपैकी असली पाहिजे. रस्त्यावर तलवार फिरून जीव मारण्यापेक्षा रक्तदान करणाऱ्या युवकांची देशाला गरज आहे. असेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.
हेही वाचा - प्रेरणादायी.. 'चॉकलेट' काकांच्या बलिदानामुळे तरुणाला मिळाला ऑक्सिजन, दानशूर काकांनी घेतला जगाचा निरोप