अमरावती : कोरोना संकटामुळे दिवसेंदिवस जिल्ह्याची स्थिती बिकट होत चालली असून याला जिल्हा प्रशासन व पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यामुळे अमरावतीकडे आता मुख्यमंत्र्यांनीच लक्ष दिले पाहिजे अशी मागणी राणा यांनी केली आहे.
सुधारणांकडे केले दुर्लक्ष
मागील वेळी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही सुधारणा करण्याची मागणी कोली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत आहे. म्हणून आता मुख्यमंत्र्यांनीच जिल्ह्याकडे लक्ष द्यावे असेही रवी राणा म्हणाले.
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच
राज्यात कोरोना बधितांची संख्या वाढत असतानाच अमरावती जिल्ह्यातही कोरोनाने कहर केला आहे. मंगळवारी जिल्ह्यात सर्वाधिक 1123 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 23 कोरोना बधितांचा यामध्ये मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या ही 69527 वर गेली असून आतापर्यंत 1025 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. दरम्यान यापैकी 59541 कोरोना बधितांनी मात केली असून सध्या 8961 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.