अमरावती - आठवडाभरात अमरावतीत एकूण चार ठिकाणी भीषण आगीच्या घटना घडल्या आहेत. या अग्नितांडवात कोट्यवधीचे नुकसान झाले असताना एका व्यक्तीचा जीवही गेला आहे. आगीच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. कोरोना काळात फायर ऑडिट ठप्प असताना आता मात्र महापालिका प्रशासनासोबातच पोलीस दलही फायर ऑडिट संदर्भात ॲक्शन मोडमध्ये आले आहे.
असे आहे फायर ऑडिट -
महाराष्ट्र प्रतिबंधक व जीवन संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 आणि नियम 2009 हे 6 डिसेंबर 2008 पासून लागू करण्यात आले आहेत. या अधिनियमानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालय, हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉज, बियरबार, रुग्णालय, बहुमजली शैक्षणिक इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृहे, मंगल कार्यालय, औद्योगिक इमारत, गोदाम, व्यावसायिक इमारती या ठिकाणी अग्निप्रतिबंधक यंत्रणा लावणे बंधनकारक आहे. या अधिनियमाचे पालन होत आहे की नाही, याचे ऑडिट करण्याची संपूर्ण जबाबदारी ही महापालिकेवर आहे.
कोरोनामुळे फायर ऑडिट पडले ठप्प -
कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने गत दीड वर्ष शहरातील सर्व हॉटेल, लॉज तसेच अनेक व्यवसायिक प्रतिष्ठाने बंद होती. यामुळे हॉटेलचालक व इतर व्यवसायिकांनी फायर ऑडिट केले नसल्याचे अमरावतीचे महापौर चेतन गावंडे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. आता संपूर्ण बाजारपेठ खुली झाली आहे. असे असताना नियमानुसार आता फायर ऑडिट करणे गरजेचे असून प्रशासनाला याबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. संबंधितांनी आपले हॉटेल, व्यवसायिक प्रतिष्ठान तसेच इमारत मालकांनी फयर ऑडिट तात्काळ करून घेण्याचे आवाहन देखील महापौर चेतन गावंडे यांनी केले आहे.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आयुक्तांचे आवाहन -
महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी शहरातील सर्व हॉटेल-रेस्टॉरंट, कोचिंग क्लासेस, गजबजलेल्या वसाहतीतील इमारती यांचे फायर ऑडिट केले जाणार असल्याची माहिती 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. आग लागल्यानंतर नेमकी कशा प्रकारे खबरदारी घ्यावी, अग्निप्रतिबंधक यंत्रांचा नेमका वापर कशा प्रकारे करावा, या संदर्भात अग्निशमन दलाच्यावतीने नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार, असेही महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांनी दिले फायर ऑडिट करण्याचे निर्देश -
गत रविवारी पहाटे एमआयडीसी परिसरातील रासायनिक कारखान्याला आग लागली होती. या आगीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तसेच ही आग नियंत्रणात आणण्यासाठी 24 तासाच्या वर कालावधी लागला. या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी राजापेठ पोलीस ठाण्यासमोर असलेल्या होटेल इम्पेरियलमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीच्या धुरामध्ये हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी वास्तव्याला आलेल्या नागपूरयेथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली होती. त्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी फायर ऑडिट तत्काळ करण्यासंदर्भात निर्देश दिले होते.
पोलीस आयुक्तांनी बोलावली बैठक -
फायर ऑडिट संदर्भात पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी महापालिका, अग्निशमन विभाग यांच्यासह हॉटेल, लॉज, कोचिंग क्लास मॉलचालक यांची 8 सप्टेंबर रोजी बैठक बोलावली आहे. अमरावती शहरातील कोणत्या ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा असणे आवश्यक आहे. तसेच कुठल्या आस्थापनांना फायर ऑडिट बंधनकारक आहे. यासह कुठल्या आस्थापनांनी फायर ऑडिट करून घेतले आहे. याबाबतची संपूर्ण माहिती पोलीस आयुक्तांनी महापालिका प्रशासनाकडून मागविली आहे. 8 सप्टेंबरला आयोजित बैठकीनंतर फायर ऑडिटसाठी टाळाटाळ करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा - दूध दान चळवळ: 'त्या' जुळ्या बाळांना दूध पाजण्यासाठी सरसावल्या स्तनदा माता