अमरावती - शहरातील बेलपुरा परिसरात सोमवारी मध्यरात्री जमावाने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस निरीक्षकासह दोन शिपाई जखमी झाले आहेत.. या घटनेनंतर बेलपुरा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून हल्लेखोरांना घरातून अटक करण्याचे अभियान राबविण्यात आले.
शहरातील संवेदनशील भागांपैकी एक असणाऱ्या बेलपुरा परिसरात सोमवारी रात्री कुठल्यातरी कारणामुळे दोन गटात वाद झाला आणि हाणामारीला सुरुवात झाली. या घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेळके हे दोन शिपायांसह बेलपुरा परिसरात पोहचले. यावेळी त्यांनी दोन्ही गटातील लोकांना आवरण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही गटातील जमावाने अचानक पोलिसांनाच मारहाण केली. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक शेळके यांच्यासह दोन पोलीस शिपाई गंभीर जखमी झालेत. या तिघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, बेलपुरा परिसरात पोलिसांवर हल्ला झाल्याची माहिती कळताच पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूर्यवंशी हे 150 पोलिसांच्या ताफ्यासह बेलपुरा परिसरात दाखल झाले. दंगल नियंत्रण पथकही बेलपुरा परिसरात तैनात झाले.
दरम्यान, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना पकडण्यासाठी बेलपुरा परिसरातील घरांमध्ये घुसून पोलीस आरोपींना पकडण्याची मोहीम राबवत आहेत. रात्री 2 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. काही हल्लेखोरांना घरात घुसून पकडण्यात आले आहे. संपूर्ण बेलपुरा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून परिसरात प्रचंड तणाव आहे.