अमरावती - स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात उमेदवार दिल्याने राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा आहेत. तर प्रत्येकवेळी राग आला म्हणून सरकारबाहेर पडणे योग्य नसल्याचे आमदार देवेंद्र भुयार म्हणाले आहेत.
१७ एप्रिलला निवडणूक
राज्यातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुकीचे वारे सध्या राज्यात वाहू लागले आहे. राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाल्याने येथे पोटनिवडणूक लागली आहे. यासाठी १७ एप्रिलला निवडणूक पार पडणार आहे, तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले आहे. तर भाजपानेही भगीरथ भालके यांना टक्कर देण्यासाठी समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. परंतू या पोटनिवडणुकीत आधीच महाविकास आघाडी व राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असली तरी महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही सचिन राऊत यांना उमेदवारी देत रिंगणात उतरवले आहे.
'महाविकास आघाडीमध्येच राहुन कामे करणार'
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या उमेदवारीवरून माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, प्रत्येकवेळी राग आला, चीड आली म्हणून सरकार बाहेर पडणे योग्य नाही, असा सबुरीचा सल्ला आमदार देवेंद्र भुयार यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिला आहे. राजू शेट्टी जर कदाचित महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले तरी मी मात्र महाविकास आघाडीमध्येच राहुन विकास कामे करणार असल्याचे ते म्हणाले.
रंगत वाढली
१७ एप्रिलला पार पडणाऱ्या पंढरपूर-मंगळवेढा या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवार उभा केल्याने रंगत वाढली आहे. त्यासाठी आता प्रचारही सुरू होणार आहे. मात्र मतदारसंघात सुरू असलेल्या कामाच्या भूमिपूजनामुळे मी प्रचाराला जाणार नसल्याचे स्पष्टीकरण भुयार यांनी दिले आहे.