अमरावती - कृषी केंद्र आणि खते-बियाणे वाटप करणाऱ्या दुकानांमध्ये गर्दी होऊन कोरोना संक्रमण होऊ शकतो. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालता यावा, यासाठी अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सार्सी गावातील शेतकऱ्यांनी एक प्रयोग केला. या गावातील शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बाहेर गावी न जाता, थेट गावातच खते-बियाणे उपलब्ध करुन दिली आहेत.
सार्सी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत एक गट स्थापन केला. या गटामार्फत एका कंपनीसोबत संपर्क साधला. गावातील शेतकऱ्यांना गावातच खते आणि बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले. याअंतर्गत तब्बल 600 बॅगा खते आणि बि-बियाणे शेतकऱ्यांना त्यांच्या गावात उपलब्ध झाली. या प्रक्रियेतून शेतकऱ्यांच्या पैशाची आणि वेळेची बचत झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा... जाणून घ्या, चक्रीवादळाला कसे मिळाले 'निसर्ग' नाव?
तिवसा तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे. या उपक्रमासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या बांधावर बि-बियाणे, खते पोहचवण्याचे आदेशानुसार तिवसा नगर पंचायतचे नगराध्यक्ष वैभवज वानखडे, पंचायत समिती कृषी अधिकारी गावंडे, तहसीलदार वैभव फरतारे आदींनी सहकार्य केले.