अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सध्या कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर आणि सिनेट सदस्यांमध्ये वाद पेटला आहे. सिनेट सदस्यांनी कुलगुरुंविरोधात पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यामागे प्रसिद्धी मिळविण्याचा सिनेट सदस्यांचा उद्देश असल्याचे कुलगुरूंनी म्हटले आहे. त्यानंतर हा वाद आणखीच चिघळला आहे.
आरोप-प्रत्यारोप सुरूच-
दरम्यान, डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडे कुलगुरू पदासाठी हवी ती पात्रताच नाही, असा आरोप सिनेट सदस्यांनी केला आहे. कुलगुरूंच्या अनेक खोटया प्रकारांचे पुरावे आमच्याकडे आहेत. राज्यपालांनी त्यांची नियुक्ती केली असल्याने आणि आम्ही कुलगुरू पदाचा मान राखत असल्याने आजवर गप्प होतो. आता आम्हाला प्रसिद्धीची हाव असल्याचा आरोप करणाऱ्या कुलगुरूंच्या प्रसिद्धीला आम्ही राज्यभर प्रसिद्धी मिळवून देऊ, असा इशाराही सिनेट सदस्यांनी दिला.
मंगळवारी सिनेटची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली. ऑनलाईन बैठकीला 40 सिनेट सदस्यांचा विरोध असून याबाबत सिनेट सदस्यांनी कुलगुरूंना निवेदन सादर केले. सभा ऑनलाईन होणार, या निर्णयावर कुलगुरू ठाम होते. निवेदन देतांना डॉ. भि. र. वाघमारे, डॉ. विवेक देशमुख, डॉ. संतोष ठाकरे, प्रा. दिलीप कडू, प्रदीप देशपांडे आदी सिनेट सदस्य उपस्थित होते.
सिनेट सदस्य म्हणाले-
आमच्यापैकी एकही व्यक्ती प्रसिध्दी पिपासू नाही. असे असताना आम्हाला प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषद घ्यावी लागली, असे म्हणणे कुलगुरूंना शोभणारे नाही. साडेचार वर्ष व्यवस्थित पार पडले म्हणजे आपल्या चूका कोणाला माहिती नाहीत. या भ्रमात कुलगुरूंनी राहू नये. डी. मुरलीधर चांदेकर यांनी कुलगुरू पदासाठी नागपूर आणि अमरावती विद्यापीठात केलेल्या अर्जांची प्रत आमच्याकडे आहे. कुलगुरूंचे शिक्षण, त्यांनी केलेले संशोधन, परदेशातील परिषदांमध्ये त्यांचा सहभाग, हे विषय घेऊन आम्ही समोर आलो तर चार महिने महाराष्ट्रभर आम्हाला प्रसिद्धी मिळू शकते, असा इशारा सिनेट सदस्यांनी दिला आहे.
तर महाराष्ट्रभर वादळ निर्माण होईल-
वर्षभरापूर्वी नागपूर विद्यापीठाने अपात्र ठरवलेली व्यक्ती वर्षभरानंतर पात्र कशी ठरते. त्यांच्या जातीचाही घोळ आहे. स्व.लक्ष्मणराव मानकर संस्था अनेकांना रिसर्च प्रोजेक्ट पुरविते त्या संस्थेचा रिसर्च प्रोजेक्ट कुलगुरू सादर करतात. हे सगळे प्रकरणं आमच्याकडे आहेत. मात्र आजवर आम्ही कुलगुरू पदाचा मान राखून हे विषय टाळलेत. आता हे म्हणतात आम्ही प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषद घेतली. आमच्याकडे असणारे प्रत्येक विषय एक एक करून बाहेर आणले तर महाराष्ट्रभर वादळ निर्माण होईल, असे देखील सिनेट सदस्य म्हणाले.
कुलगुरूंनी दिला कारवाईचा इशारा-
ऑनलाईन सिनेट सभेत कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी याबाबत कारवाईचा इशारा दिला आहे. सिनेट सदस्यांनी पत्रकार परिषद का घेतली, याचा खुलासा द्यावा लागणार आहे. त्यांच्या खुलाशावर कायदेशीररित्या निर्णय घेऊन कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा - 'संपूर्ण जगाला कोरोनाची लस मिळेपर्यंत शांत बसणार नाही'