अमरावती - अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे ( Nandgaon Peth MIDC Texttile Park ) टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. तेथे संपूर्ण पायाभूत सुविधा तसेच लगतची जागा उपलब्ध आहे. त्यामुळे 'पीएम-मित्रा' ( PM Mitra ) अंतर्गत देशात नव्याने मंजूर होणाऱ्या पार्कपैकी एक पार्क तेथे उभारण्यात यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Demand Texttile Park In Amravati ) यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना एका पत्राव्दारे केली आहे.
अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची मागणी - विदर्भातील अमरावती विभागातसुद्धा कपाशीचे मोठे उत्पादन होते. त्यामुळे कापूस उत्पादकांना तेथेच उत्पादनाच्या विक्रीची हमी आणि चांगला भाव मिळावा, या उद्देशातून अमरावतीनजीक नांदगाव पेठ येथे टेक्स्टाईल पार्कच्या संपूर्ण पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ४० टेक्स्टाईल क्लस्टर्स आणि १४ टेक्स्टाईल पार्क आहेत. मात्र, कच्चा माल जागीच उपलब्ध व्हावा, या उद्देशाने अमरावती येथे टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्यात यावी. या परिसरात पर्यावरणाची परवानगी मिळणे सुद्धा सहज शक्य आहे. या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा सुद्धा निर्माण आहेत. 'पीएम-मित्रा' अंतर्गत समाविष्ट असलेला टेक्स्टाईल पार्क मंजूर करण्यात आल्यास या परिसराला मोठा लाभ मिळेल आणि अतिशय अल्पावधीत या प्रकल्पाला भव्यता प्राप्त होईल. अतिशय गतीने हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल. येथे केंद्राचा टेक्स्टाईल पार्क जाहीर झाल्यास या भागात आर्थिक गतिविधींना वेग येईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दिले पत्र - देशात नवीन टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र पाठविले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होते. त्यामुळे वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने मोठी क्षमता राज्यात आहे.