अमरावती: महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांसाठी दिवस रात्र २४ तास चालणारी निःशुल्क आपत्कालीन सेवा चाईल्ड लाईन १०९८ वर शेंदूरजनाघाट पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावामध्ये २० वर्षीय मुलाचा बालविवाह २१ वर्षीय तरुणीशी होत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार चाईल्ड लाईन टीमने या प्रकरणा विषयी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बालकल्याण समिती, जिल्हा बालसंरक्षण कक्ष कार्यालय, अमरावती यांना पत्र दिले.
त्यानंतर शेंदूरजनाघाट पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक यांच्याशी प्रकरणाबाबत चर्चा करून मुलाच्या घरी जाऊन शहानिशा केली यावेळी गावातील एक तरुणीने गावातीलच एका अल्पवयीन मुलाला आपल्या प्रेम जाळ्यात अडकवून लग्न करण्याचा तगादा लावल्याचे समोर आले. फक्त आठ पत्रिका छापून लग्न लावण्याची तयारी केली. परंतु लग्न विधीचा कार्यक्रम आटोपण्याच्या काही वेळ आधीच होणारा बालविवाह थांबविण्यास चाईल्ड लाईन टीमला यश प्राप्त झाले.
त्यानंतर सदर तरुणीचे व अल्पवयीन मुलाचे समुदेशन करून बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण होणे गरजेचे असल्याचे सदर तरुणीला व मुलाला तसेच गावातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच यांना सदर कायद्याची जाणीव करुन दिली. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार तरुणीचे व तिच्या मावशी, मुलाच्या पालकांचे, हमी पत्र लिहून घेतले की, मुलाचे २१ वर्ष पूर्ण होईपर्यंत अल्पवयात बालविवाह करणार नाही.
तसेच सदर तरुणीला व पालकांना बालकल्याण समिती अमरावती यांच्या समक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. पोलीस ठाण्याकडून नोटीस बजावली. मुलाचे २१ वर्ष पूर्ण होई पर्यंत बालकांवर देखरेख व काळजी तसेच पुढील मदत व पाठपुरावा चाईल्ड लाईन टीम अमरावती करणार आहे. हा बालविवाह रोखण्याचा मोहिमेकरीता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, मंडळाच्या सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके, चाईल्डलाइन चे संचालक प्रा. डॉ. नितीन काळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. उमेश टेकाडे, बालकल्याण समिती सदस्या अंजली घुलक्षे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
चाईल्डलाईन टीम अमरावतीचे जिल्हा समन्वयक अमित कपूर, समुपदेशक सपना गजभिये, टीम मेंबर मीरा राजगुरे, पंकज शिनगारे, सरिता राऊत, अजय देशमुख, शंकर वाघमारे, ऋषभ मुंदे, अभिजीत ठाकरे, तसेच शेंदूरजना घाट चे पोलिस निरीक्षक सतीश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक थोरात व सहकारी, ग्राम सेवक अंभोरे, सरपंच धनराज बमनोटे, उपसरपंच निकलेश खंडेलवाल, पोलीस पाटिल सारिका डोंगरे यांनी केले.