अमरावती : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले कृषीमंत्री दादा भुसे यांच्या वाहनांचा ताफा भाजप कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी या कार्यकर्त्यांनी वाहनांच्या ताफ्याला काळे झेंडेही दाखविले.
बोरखेडीजवळ ताफा अडविण्याचा प्रयत्न
कृषी मंत्री दादा भुसे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अमरावती-दर्यापूर मार्गावर बोरखेडीजवळ भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून कृषी मंत्र्यांचा निषेधही केला. अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातही शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कृषी मंत्र्यांनी भातकुलीमध्येही पाहणी करायला हवी होती आणि आमच्या समस्या जाणून घ्यायला हव्या होत्या असे आंदोलक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. कृषी मंत्री भातकुलीला न थांबल्याने त्यांना काळे झेंडे दाखविल्याचे भातकुलीचे भाजप तालुका अध्यक्ष विकास देशमुख यांनी म्हटले आहे.
भातकुलीत मोठेन नुकसान
चार दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ,भातकुली, चांदूर बाजार या परिसराला अतिवृष्टीने चांगलेच झोडपले. यात भातकुली तालुक्यातील रामा साहूर, टाकरखेडा संभु या परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेती वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर, चिपळूणसह इतर पूरग्रस्त भागात करणार पाहणी