अमरावती - राज्यातील मंदिरे उघडा या मागणीसाठी भाजपा राज्यभर आंदोलन करत आहे. परंतु मंदिरे उघडायची असेल तर दिल्लीत जाऊन घंटा वाजवा, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला होता. दरम्यान संजय राऊत यांच्या सल्लाला उत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे खोट बोल आणि रेटून बोल असे व्यक्तीमत्व, असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. ते अमरावतीत माध्यमांशी बोलत होते.
'मंदिरे सुरू करण्यास काय अडचण?'
मंदिर बंद ठेवण्याबाबत केंद्र सरकारने अशी कुठलीही भूमिका मांडली नसल्याने देशातील जवळपास सर्वच राज्यातील मंदिरे सुरू झाली आहेत. त्यामुळे निर्बंध घालून मंदिरे सुरू करण्यास हरकत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. पण राज्यात जवळपास सर्वच गोष्टी सुरू झाले आहे. बारही सुरू झाले आहे. मग मंदिर सुरू करण्यास काय अडचणी आहे? असा सवालही चंद्रकांत पाटलांनी विचारला आहे. अमरावतीच्या दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोबत राहायचे नव्हते तर मग युती केली कशाला? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यापुढे आता एकट्याच्या जीवावर लढणार असल्याचाही घोषणा चंद्रकांत पाटलांनी अमरावतीत केली आहे. 56 सीटवर मुख्यमंत्री होतात. 105 सीट घेणाऱ्यांना टाटा करता हा विश्वासघात असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा - 12 सदस्यांच्या नावांमध्ये अडचण आल्यास मुख्यमंत्री निर्णय घेतील - अजित पवार