अमरावती - अर्धांगवायूच्या आजारावर आयसीयू विभागात उपचार घेणाऱ्या एका ७१ वर्षीय रुग्णाच्या शरीराच्या विविध भागांवर मुंग्यांनी चावा घेतल्याचा (Ants attack Patients Body) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय (Dr Panjabrao Deshmukh Hospital Amravati) येथे घडला आहे. विष्णूपंत साठवने असे या ७१ वर्षीय रुग्णांचे नाव आहे.
- रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह -
साठवने यांना काही दिवसांपूर्वी अर्धागवायूचा झटका आला होता. अशातच बुधवारी त्यांना सायंकाळी उपचारासाठी अमरावती शहरातील प्रसिद्ध डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान आज सकाळी त्यांच्या शरीराच्या विविध भागांवर लाल मुंग्यांनी चावा घेतला. यामध्ये विष्णुपंत साठवने यांच्या एका डोळ्याखाली तसेच गुप्तांग भागाला जखमा झाल्या आहेत. सकाळी रुग्णाच्या नातेवाईकांचे लक्ष गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. लगेच त्यांनी एका कापडाने त्या सर्व मुंग्या पुसून काढल्या. या संपूर्ण घटनेने मात्र आरोग्य यंत्रणा किती बेफिकीर आहे हे समोर आलं आहे.
- नर्सला नोटीस जारी-
गोरगरीबांच्या आरोग्य सेवेसाठी डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी आपलं आयुष्य झिजवल होतं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. येथे उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत असतात. परंतु, येथे मिळणारी वागणूक, व्यवस्था मात्र अतिशय भयंकर आहे. यापूर्वीही येथे चार चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा चक्क जिवंत रुग्णाला मुंग्या चावा करत असताना डॉक्टर आणि नर्स काय करत होत्या? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी वार्डातील नर्सला शोकॉज नोटीस दिली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.
- नर्स व सुरक्षारक्षकांची दादागिरी -
झालेल्या प्रकारासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी वार्डातील नर्सला विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीचे उत्तरं दिलं असल्याचं नातेवाईकांचे म्हणणे आहे. तसेच झालेल्या प्रकाराचे चित्रीकरण करत असताना सुरक्षारक्षकाने धमकावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.