अमरावती - रविवारचा दिवस सर्व जण आनंदी होते. कुणाला लग्नसराईत जायची धूम, तर कुणाला गावाला जायची, तर चिमुकल्यांना रविवारची सुटी खेळात घालवायची होती. हातावर पोट असणारे अमरावतीच्या वलगाव येथील पेढी नदी प्रकल्पग्रस्त आपल्या टिनाच्या छतात डोक्यावरचं पक्क छप्पर समजून गुण्या गोविदाने नांदत होते. पण महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार जीवावर उठला. विजेच्या खांबावरील लोंबलेल्या तारा कारणीभूत ठरल्या अन क्षणार्धात या ३८ कुटुंब होत्याचं नव्हतं झालं. आग एवढी भीषण होती की आयुष्याच्या कमाईचा क्षणार्धात कोळसा झाला.
सगळीकडे एकच कल्लोळ पसरलेला होता. पोटाची शिदोरी म्हणून काही महिलांनी पै-पै गोळा करून जमवलेल्या पैशाचे या आगीत पाणी झाले. कुणाचे पैसे जळून गेले तर कोणाचा वर्षभराच धान्य खाक झाले. एका आजीचे किराणा दुकान जळले, तर कुणाच्या लेकीच्या साखरपुड्याचे साहित्य अन् कोणाची बैल जोडी जळून गेली. शासनाचे थंड धोरण पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळून गेले.
एकंदरीत पहाल तर हे ३८ कुटुंब कायमचेच उद्ध्वस्त झाले. आता राहायला घर नाही, अंग झाकायला कापडही नाही, खायला अन्न नाही जगावे तरी कसे? असा प्रश्न वलगावच्या बाजारपुऱ्यातील आगपीडित लोकांसमोर उभा ठाकला आहे.
२००७ मध्ये पीडी नदीला महापूर आला आणि या कुटुंबाचे संसार पाण्यात वाहून गेले होते. जगण्यासाठी धडपड करणारे हे कुटुंब वलगावच्या बाजारपुर्याजवळ स्थाईक झाले. कुणाचे कुडा मातीचे, तर कुणाचा टिनाचा आशियाना बांधून ते राहत होते. परंतु काल लागलेल्या या आगीने होत्याचे नव्हते झाले. आगीची बातमी कळताच या प्रकल्पग्रस्तांच्या आगीवर आपली राजकीय पोळी भाजायला सर्वच पक्षाचे राजकीय नेतेही आले. सत्ताधाऱ्यांनी आश्वासाचा बाजार मांडला, तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या घटनेला जबाबदार ठरवले. दिवस निघाला की, जगण्यासाठीची धडपड या प्रकल्प ग्रस्तांची आहे. २००७ मध्ये कमावलेले पुराने वाहून नेले, ती जखम ताजी असतानाच कालच्या आगीने या कुटुंबाच्या आयुष्याच्या कमाईचा मात्र कोळसा केला.