अमरावती - विद्यार्थ्यांची कागदपत्रे गहाळ होणे, विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे, विद्यार्थ्यांचे निकाल रोखणे असा प्रकार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए डिपार्टमेंटमध्ये सुरू असून या डिपार्टमेंटचे नाव मास्टर ऑफ बोगस अॅडमिनिस्ट्रेशन करावे, असा रोष युवक काँग्रेसने व्यक्त केला आहे. या विभागाचा कारभार सुधारला नाही तर आंदोलन करू, असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर देशमुख यांनी दिला आहे.
10 विद्यार्थ्यांची कागदपत्रे गहाळ
2018-19मध्ये विद्यापीठात एमबीएला प्रवेश घेतलेल्या 10 विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्र गहाळ झालेत. ज्यामध्ये 4 विद्यार्थ्यांच्या पदवीच्या गुणपत्रिका, 5 विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र आणि एका विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र आहे. आपली मूळ कागदपत्रे मिळावी, यासाठी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे अनेकदा निवेदने सादर केली, मात्र उपयोग झाला नसल्याचे देशमुख पत्रकार परिषदेत म्हणाले.
द्वितीय वर्षाला असणाऱ्या विद्यार्थिनींचा प्रवेश केला रद्द
2019-20मध्ये एमबीए प्रथम वर्षाला हेमा शरद शर्मा या विद्यार्थिनीला प्रवेश देण्यात आला. प्रवेश समितीकडे तिने सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आणि बी. कॉम.चा निकाल लागल्यावर बी. कॉम.ची गुणपत्रिका प्रवेश समितीकडे सादर केली. एमबीए भाग 1ची परीक्षा झाल्यावर तिने एमबीए भाग 2मध्ये प्रवेश घेतला आणि ऑनलाइन अभ्यास सुरू केला. असे असताना विद्यापीठाने तिचे घरी पत्र पाठवून तिचा प्रवेश रद्द करण्यात आल्याचे सांगितले. या गंभीर प्रकरणामुळे हादरलेल्या हेमा शर्माने कुलगुरूंकडे चक्क आत्महत्या करण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान, कुलगुरूंनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करून हेमा शर्माने न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आता 2 महिने उलटूनही हेमा शर्माला कुठलाही न्याय मिळाला नाही.
सिनेटमध्ये विद्यार्थिनीलाच ठरविले दोषी
हेमा शर्मा प्रकरणाबाबत 12 मार्चला झालेल्या सिनेटच्या बैठकीत मनीष गवई या सिनेट सदस्याने प्रश्न उपस्थित केला असता विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने हेमा शर्मा या विद्यार्थिनीलाच दोषई ठरविण्यात आल्याचा रोष युवक काँग्रेसच्यावतीने पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.