अमरावती - महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये नवाबाचा मुखवटा घेऊन वावरणारे नवाब मलिक हे मंत्री असून प्रत्यक्षात मात्र कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि देशद्रोही दाऊद इब्राहिमची गुलामगिरी करीत असल्याचे ईडीच्या आरोपपत्रावरून स्पष्ट होत आहे. यामुळे देशद्रोही नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अमरावती शहर भाजपच्या वतीने ( Amravati bjp demand nawab malik resignation) करण्यात आली आहे. यासंदर्भात शहर भाजपचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दाऊदचा हस्तक असणाऱ्या मंत्र्याची उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून महाराष्ट्र वाचवावा, अशी मागणी केली.
शरद पवारांनी घ्यावी भूमिका
नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना सुद्धा आता नवाब मलिक यांचा खरा चेहरा ईडीच्या कारवाईमुळे कळला असेलच. यामुळे पक्षप्रमुख म्हणून शरद पवार यांनी नवाब मलिक यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही किरण पातुरकर यांनी केली.
तर आंदोलन छेडणार
केवळ आपली सत्ता टिकविण्यासाठी एखाद्या देशद्रोही मंत्र्याचा बचाव करणे महाराष्ट्र सरकारला शोभणारे नाही. मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, नवाब मलिक यांची हकालपट्टी करण्याची तयारी राज्य सरकारची नसेल तर, नवाब मलिक यांच्याविरोधात भाजप तीव्र आंदोलन छेडणार, असा इशाराही किरण पातुरकर यांनी दिला.
हेही वाचा - अमरावतीत 'निर्भय भव:' उप्रकमातून विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे, पाहा व्हिडिओ...