अमरावती - महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची आणि विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणाऱ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक उद्या रविवारी दि. 11 सप्टेंबरला होत आहे (Shivaji Education Institute election on Sunday ). राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आणि संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि काँग्रेसचे नेते नरेशचंद्र ठाकरे या दोन गटात या निवडणुकीसाठी थेट लढत आहे (Deshmukh Naresh Thackeray direct fight).
हर्षवर्धन देशमुख दुसऱ्यांदा मैदानात - श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी अरुण शेळके यांना पराभूत करून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचेअध्यक्षपद मिळविले. आता पुन्हा दुसऱ्यांदा हर्षवर्धन देशमुख हे अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या मैदानात आहेत.
देशमुख पाटील वाद रंगणार - श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत यावर्षी देशमुख आणि पाटील वाद उफाळून आला आहे. निवडणुकीमध्ये हा वाद रंगणार असे चित्र आहे. मतदार नेमकी काय भूमिका घेतात हे 11 सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीतच स्पष्ट होईल.
निवडणुकीत या मुद्द्यावर भर - श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकी आजीवन सभासदांच्या पाल्यांना संस्थेत नोकरी देणे आणि आजीवन सदस्य असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना संस्थेचे सभासद करून घेणे हा विषय गाजतो आहे. दोन्ही पॅनलच्या वतीने या दोन विषयांवर भर दिला जातो आहे.
अशी आहे मतदार संख्या - श्री शिवाजी शिक्षण संस्थेत एकूण 710 मतदार आहेत. यापैकीच 450 पेक्षा अधिक मतदार हे पाटील आहेत. निवडणूक रिंगणात असणाऱ्या दोन्ही पॅनलमध्ये पाटील उमेदवारांची संख्या अधिक आहे.
असा आहे संस्थेचा इतिहास - देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी एक जुलै 1932 रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. विरार मराठा एज्युकेशन सोसायटीकडून अमरावतीत एक शाळा संस्थेने चालवायला घेतली. श्री शिवाजी असे या शाळेचे नाव होते. आज श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक शाळा आणि महाविद्यालय आहेत. अमरावती शहरात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल श्री शिवाजी शिक्षण संस्थेत होते.
यांनी भूषवले अध्यक्षपद - श्री शिवाजी शिक्षण संस्थेत आतापर्यंत बाबासाहेब घारफळकर, दादासाहेब काळमेघ, रावसाहेब इंगोले, वसंतराव धोत्रे, अरुण शेळके आणि हर्षवर्धन देशमुख यांनी अध्यक्षपद भूषवले आहे.