मुंबई- शेअर बाजारात नऊ दिवसांच्या तेजीनंतर आजच्या सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाली आहे. इन्फोसिसच्या शेअरमध्ये सुमारे १२ टक्क्यांची घसरण झाल्यानंतर त्याचा शेअर बाजारावर परिणाम दिसून आला आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 677.86 अंकांनी घसरून 59,753.14 वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक 200 अंकांनी घसरून 17,628 वर आला.
चौथ्या तिमाहीतील निव्वळ नफ्यात इन्फोसिस कंपनीने अपेक्षेपेक्षा कमी वाढ नोंदिवली आहे. टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्येदेखील घसरण झालेली दिसून आलेली आहे. तर पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले, टायटन आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक स्ट्रॅटेजिस्ट व्ही के विजयकुमार म्हणाले, चौथ्या तिमाहीतील इन्फोसिसच्या कामगिरीने गुंतवणूकदार निराश झाले आहेत. त्याचा परिणाम आयटी कंपन्यांच्या शेअरवर झाला आहे.
गुंतवणुकदारांचे अंदाज चुकले- आशियाई बाजारांमध्ये, सोल आणि जपानमधील शेअर बाजारातदेखील घसरण झाली आहे. तर शांघाय आणि हाँगकाँग देशातील शेअर बाजाराचा निर्देशांक वधारले आहेत. शुक्रवारी अमेरिकेचे बाजार घसरले होते.मेहता इक्विटीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तपासे म्हणाले, की टीसीएस आणि इन्फोसिसच्या चौथ्या तिमाहीतील निकालांमुळे गुंतवणूकदारांचे अंदाज चुकले आहेत. घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित मार्चच्या महागाई कशी असेल याकडे गुंतवणूकदाचे लक्ष असणार आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण- आंबेडकर जयंतीनिमित्त शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार बंद होते. गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 38.23 अंकांनी वाढून 60,431 वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर 15.60 अंकांनी वाढून 17,828 वर बंद झाला. जागतिक बाजारात बेंचमार्क ब्रेंट क्रूडचे दर 0.07 टक्क्यांनी वाढून 86.37 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गुरुवारी 221.85 कोटी रुपयांच्या शेअर खरेदी केली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी घसरून 81.90 वर आला.