मुंबई : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) आणि ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट (GEAPP) यांची मुंबईत नुकतीच भागीदारीबाबत बैठक झाली. यामध्ये महाराष्ट्रात आगामी काळात 500 मेगावॅट सौर प्रकल्पांवर लक्ष्य केंद्रित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. या बैठकीदरम्यान महाप्रित आणि जीईएपीपीने पीएम-कुसुम मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी 500 मेगावॅटच्या निविदेच्या अंमलबजावणीसाठी आराखडा तयार केला. ज्यामुळे महाराष्ट्राला सौर ऊर्जेमध्ये 2 हजार 500 कोटींची गुंतवणूक आणता येणार आहे. त्याचसोबत कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन वार्षिक 4 लाख टनांनी कमी करता येणार असून याचा 1 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.
स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना : महाप्रितचे मुख्य महाव्यवस्थापक दीपक कोकाटे यांनी सौर प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबतची माहिती सादर केली. प्रकल्प व्यवस्थापन युनिटचे रमणदीप सिंग यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याकरिता येणाऱ्या विविध कामांबाबतची रूपरेषा यावेळी सादर केली. महाप्रितचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी म्हणाले, “स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी GEAPP सोबत महाप्रितने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या भागीदारीद्वारे आम्ही मुख्यमंत्री सौरऊर्जा कृषी वाहिनी 2.0 नुसार 2025 च्या अखेरीस 7 हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे राज्याचे उद्दिष्ट सक्षम करू,” अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रकल्प व्यवस्थापन युनिटची स्थापना : ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट (GEAPP) द्वारे प्रकल्प व्यवस्थापन युनिटची (Project Management Unit) नियुक्ती करण्यात आली आहे. हा प्रकल्प व्यवस्थापन युनिट जमिनीचे सर्व्हेक्षण, जमिनीची एकूण मागणी आणि EPC कंत्राटदारांची नियुक्ती याबाबत महाप्रितला मदत करेल. प्रकल्प व्यवस्थापन युनिटद्वारे सौरऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी आणि विविध शासकीय विभागांशी समन्वय साधण्याचे काम करण्यात येईल. महाप्रित आणि GEAPP द्वारे 500 मेगावॅट विकेंद्रित सौरऊर्जेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योग समूहांमध्ये सौरऊर्जा उपक्रम राबविण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सांगली, नाशिक, इचलकरंजी आणि कोल्हापूर या जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील यशानंतर हा उपक्रम उर्वरित महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने २०१७ आणि २०१९ मध्ये शेतकरी आणि लघु उद्योगांच्या कमाईत सुधारणा करण्याच्या उद्देशाने अनेक योजना आणि कार्यक्रम सादर केले. GEAPP ने याआधीच स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगी (MSME) संघटनांशी चर्चा सुरू केली. भविष्यातही प्रकल्प व्यवस्थापन युनिट (PMU) कार्यक्रम प्रभावी आणि कार्यक्षम होण्यासाठी काम करेल. GEAPP ही संस्था या क्षेत्रासाठी आर्थिक संबंध वाढविण्यासाठी क्रेडिट गॅरंटी यंत्रणा तयार करण्यासाठी काम करत आहे. - GEAPP चे उपाध्यक्ष श्री. सौरभ कुमार
हेही वाचा -
- Today Vegetable Rate: एपीएमसी मार्केटमध्ये काय आहेत आज भाजीपाल्याचे दर? वाचा क्रिप्टोकरन्सी, सोने चांदी आणि पेट्रोल डिझेलचे दर
- Foxconn Pulls Out JV With Vedanta : फॉक्सकॉनने महाराष्ट्रानंतर गुजरातमधील प्रकल्प गुंडाळला; आदित्य ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप
- Money Laundering Law: ईडीची ताकद वाढली; जीएसटी चुकवणार्यांवर मनी लाँड्रिंग विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई होणार