नवी दिल्ली - कोरोनाचे संकट असताना घाऊक बाजारपेठेतील महागाई घसरल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसून आले आहे. फेब्रुवारीमध्ये घाऊक बाजारपेठेमधील महागाई ही २.२६ टक्के होती. तर मार्चमध्ये घाऊक बाजारपेठेतील महागाईचे प्रमाण हे १ टक्के झाले आहे.
अन्नाच्या वर्गवारीतील महागाईचे प्रमाण हे फेब्रुवारीमध्ये ७.७९ टक्के होते. ही महागाई घसरून मार्चमध्ये ४.९१ टक्के प्रमाण झाले आहे. ही आकडेवारी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज जाहीर केली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी २५ मार्चपासून देशभरात टाळाबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मार्चमध्ये महागाईची आकडेवारी गोळा करण्यावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.
हेही वाचा-टाळेबंदीत भारतीयांना कोरोनाची नव्हे तर 'ही' भेडसावते चिंता
मार्चमध्ये भाजीपाल्यामधील महागाई ही ११.९० टक्के होती. तर फेब्रुवारीमध्ये भाजीपाल्यामधील महागाई ही २९.९७ टक्के होती. फेब्रुवारीप्रमाणे मार्चमध्येही कांद्याचे दर चढेच राहिले आहेत. इंधन आणि उर्जा क्षेत्रातील महागाई घसरून १.७६ टक्के नोंदविण्यात आली. तर उत्पादन क्षेत्रातील महागाई ही ०.३४ टक्क्यांनी वाढली आहे. ही महागाईची आकडेवारी तात्पुरती असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा-रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम परत करण्यास विमान कंपन्यांचा नकार!