मुंबई - जीएसटीच्या परिषदेने कॉर्पोरेटवरील कर कपातीच्या निर्णय घेतल्याने शेअर बाजारात उत्साहाची लाट आली आहे. शेअर बाजार निर्देशांक हा २२०० एवढ्या विक्रमी अंकाने वधारला आहे. तर उद्योगांमधून केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांनी घेतलेल्या कर कपातीच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
जीएसटी परिषदेत कॉर्पोरेटवरील कर कपात करण्यात आल्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला. या निर्णयाने कॉर्पोरेट कर हा ३० टक्क्यांवरून थेट २२ टक्के होणार आहे. या निर्णयानंतर शेअर बाजार निर्देशांक सतत वधारत आहे. शेअर बाजार दुपारी २ वाजून २० मिनिटाला २२०२ अंशाने वधारून ३८,२९५.८५ वर पोहोचला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक हा ६५५.८५ अंशाने वधारून ११,३६०.६५ वर पोहोचला. पीडब्ल्यूसी इंडियाचे फ्रँक डिसुझा म्हणाले, कॉर्पोरेट कर कपात हा स्वागतार्ह निर्णय आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदार आकर्षित होणार आहेत. सीएसआरमधील बदल आणि बायबॅक शेअरच्या करात दिलासा यामधून संशोधन आणि विकासामध्ये निधी गुंतवणुकीचे प्रमाण वाढले, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली.
सीआयआय ट्विट
कॉर्पोरेट कर हा सरसकट ३० टक्क्यांवरून २२ टक्के करावा, ही उद्योगाची जुनी मागणी आहे. सरकारने अभूतपूर्व आणि धाडसी असा निर्णय घेतल्याचे सीआयआयचे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी म्हटले.
एफडीआय आणि उत्पादन क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढेल-
अशोक माहेश्वरी अँड असोसिएशट्स एलएलपी भागीदार अमित माहेश्वर म्हणाले, दुसऱ्या आशियन देशांच्या तुलनेत आपण मोठी गुंतवणूक गमावित आलेलो आहोत. एशिनय देश हे सातत्याने कॉर्पोरेट कर कमी करत आलेले आहेत. कर कपातीने एफडीआय आणि उत्पादन क्षेत्राकडे गुंतवणूक आकर्षित होईल.
भारतीय कंपन्या अमेरिकन कंपन्यांबरोबर स्पर्धा करू शकतील-
अमेरिकेतील कमी कॉर्पोरेट कर असताना भारतीय कंपन्या अमेरिकन कंपन्यांबरोबर स्पर्धा करू शकतील, असे कोटक महिंद्राचे सीईओ उदय कोटक यांनी ट्विट केले. सरकार आर्थिक सुधारणांसाठी बांधील असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच कंपन्यांना कर नियमांचे पालन करण्यासाठी मदत होणार आहे.
कॉर्पोरेट कर कमी करणे हा धाडसी निर्णय -
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कॉर्पोरेट कर कपातीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सर्व कॉर्पोरेट कर कमी करणे हा धाडसी निर्णय आहे. त्याचा सर्व क्षेत्राला फायदा होणार आहे.
दिवाळी लवकरच आल्यासारखे वाटतयं-
महिंद्रा अँड महिंद्राचे संचालक पवन गोयंका यांनी ट्विट करत दिवाळी लवकरच आल्यासारखे वाटत असल्याचे म्हटले आहे.
हुशारीचे पाऊल!
नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. हुशारीचे पाऊल!( ब्रिलियंट मुव्ह), पुढे जाण्याचा रस्ता! नैसर्गिक उत्साह (अॅनिमल स्पिरीट) मिळण्यासाठी मोठी प्रेरणा मिळणार आहे. अभिनंदन!