मुंबई - शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ८३९.९९ अंशांनी घसरून ३७,५७६.६२ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक २७९.५५ अंशांनी घसरून १०,९८९.४५ वर स्थिरावला. शेअर बाजारातील पडझडीनंतर गुंतवणूकदारांचे सुमारे ३.८५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक १,४५९.५२ अंशांनी घसरला. कोरोनाने अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि येस बँकेवरील आर्थिक संकटाने शेअर बाजारात पडझड झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर गुरुवारी निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे येस बँकेच्या ठेवीदारांना जास्तीत जास्त ५० हजार रुपये खात्यामधून काढता येणार आहेत.
हेही वाचा - येस बँकेवरील आर्थिक संकटानंतर महाराष्ट्र सरकारने 'हा' घेतला मोठा निर्णय
येस बँकेच्या शेअरमध्ये ८५ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर इंडसइंड बँक, टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसीचे शेअर ७.३ टक्क्यापर्यंत घसरले. एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसचे शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. रिलायन्सच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. तर धातू, स्थावर मालमत्ता, वित्त आणि उर्जा क्षेत्राच्या शेअरमध्ये सुमारे ४ टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे.
हेही वाचा - महा'अर्थ': कर्ज २ लाखांहून अधिक असेल तर शेतकऱ्यांना 'ही' मिळणार सवलत