मुंबई - शेअर बाजारातील तेजीमुळे आज पुन्हा एकदा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने विक्रम केला आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 958.03 अंशाने वधारून 59,885.36 वर स्थिरावला. हा आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक आहे.
मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी ट्विन्स आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले आहेत. त्यामुळे शेअर बाजाराने विक्रमी निर्देशांक नोंदविला आहे.
या कंपनीचे वधारले-घसरले शेअर
बजाज फिनसर्व्हचे सर्वाधिक 4 टक्क्यांहून अधिक शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ एल अँड टी, एचडीएफसी, अॅक्सिस बँक, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंडसइंड बँकेचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे डॉ. रेड्डीज, आयटीसी, नेस्ले आणि एचयूएलचे शेअर घसरले आहेत. वित्तीय आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात खरेदी झाली आहे. त्यापाठोपाठ धातू, आयटी आणि वाहन कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली आहे.
शेअर बाजाराचा निर्देशांक वधारण्याची ही आहेत कारणे-
चीनमधील कर्ज थकविणारी कंपनी एव्हरग्रेन्डबाबतची चिंता कमी होत आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख जेरोम पॉवेल हे नोव्हेंबरच्या सुरुवातीला मध्यवर्ती बँकेच्या नियोजनाची माहिती जाहीर करणार आहेत. अमेरिकेतील नोकऱ्यांमध्ये सुधारणा झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर 276.30 अंशाने वधारून 17,822.95 वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक खुला होताना 59,358.18 वर पोहोचला. बुधवारी शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 58,927.33 वर स्थिरावला होता.
3 सप्टेंबरला शेअर बाजार निर्देशांकाने ओलांडला 58 हजारांचा पल्ला
शेअर बाजाराने 3 सप्टेंबरला इतिहास रचला होता. या दिवशी पहिल्यांदाच बाजाराचा निर्देशांक 58 हजारांच्या पार गेला होता.