नवी दिल्ली – डिझेलची दरवाढ होत असताना अनेक दिवस पेट्रोलची दरवाढ झाली नव्हती. मात्र, पेट्रोलच्या किमतीमध्ये दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तर डिझेलचे दर हे स्थिर झाले आहेत.
नवी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोलच्या किमती 16 पैशांनी वाढून प्रति लिटर 80.73 रुपये झाल्या आहेत. पेट्रोलच्या किमती रविवारी प्रति लिटर 14 पैशांनी वाढल्या आहेत. त्यापूर्वी 29 जुलैपासून 47 दिवस पेट्रोलचे दर स्थिर राहिले होते.
जूननंतर डिझेलचे दर सातत्याने वाढले आहेत. गेली दोन आठवडे डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. सरकारी खनिज तेल विणन कंपनीतील सूत्राने सांगितले, की आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किमती वाढत आहे. त्यामुळे देशात पेट्रोलचे दर वाढले आहेत. तर डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. ऑगस्टमध्ये देशात डिझेलच्या वापराचे प्रमाण कमी होते. कोरोना महामारीचा देशातील आर्थिक चलनवलनावरील परिणाम कायम राहिलेला ऑगस्टमध्ये दिसून आला आहे.
जागतिक खनिज तेलाच्या बाजारात क्रुड ऑईलचा दर प्रति बॅरल हा 45 डॉलर झाला आहे. दिल्लीप्रमाणे इतर महानगरांमध्येही पेट्रोलचे दर वाढले आहेत.