नवी दिल्ली - प्रवासी वाहनांच्या विक्रीत ऑगस्टमध्ये १४.१६ टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू वर्षात ऑगस्टमध्ये २ लाख १५ हजार ९१६ वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये १ लाख ८९ हजार १२९ वाहनांची विक्री झाल्याची माहिती वाहन उद्योग संघटना एसआयएमने दिली आहे.
देशात ऑगस्ट २०२० मध्ये १५ लाख ५९ हजार ६६५ दुचाकींची विक्री झाली आहे. तर गतवर्षी ऑगस्टमध्ये १५ लाख १४ हजार १९६ दुचाकींची विक्री केली होती. दुचाकींच्या विक्रीत ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही आकडेवारी वाहन उद्योगाची संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्युचरने (एसआयएम) जाहीर केली आहे.
मोटारसायकलच्या विक्रीत ऑगस्टमध्ये १०.१३ टक्क्यांची वाढ झाली आहे. स्कूटरच्या विक्रीत ऑगस्टमध्ये गतवर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत १२.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. चालू वर्षात ऑगस्टमध्ये ४ लाख ५६ हजार ८४८ वाहनांची विक्री झाली आहे. तर गतवर्षी ५ लाख २० हजार ८९८ स्कूटरची विक्री झाली होती.
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी कोरोना महामारीच्या आर्थिक संकटातून सावरत आहे. मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोना महामारीचा बजाज ऑटोच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. बजाज ऑटोच्या एकूण वाहन विक्रीत यंदा ऑगस्टमध्ये गतवर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत ९ टक्क्यांची घसरण झाली आहे.