नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटातही ग्राहकांची अनेक ठिकाणी विक्रेत्यांनी लूट केल्याचे सर्वेमधून समोर आले आहे. टाळेबंदीत अनेक ग्राहकांना जीवनावश्यक आणि किराणा वस्तूंसाठी एमआरपीपेक्षा जादा पैसे मोजावे लागले आहेत. ही माहिती एका सर्वेक्षणामधून समोर आली आहे.
टाळेबंदीदरम्यान ग्राहकांना खरेदी करताना काय अनुभव आला, याबाबतचे सर्वेक्षण लोकल सर्कल्स या संस्थेने केले आहे. सर्वेतून देशातील 210 जिल्ह्यांमधील 16 हजार 500 लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत.
टाळेबंदी 1 ते 4 दरम्यान ग्राहकांना टाळेबंदी पूर्वीपेक्षा जास्त पैसे किराणा माल आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी मोजावे लागले आहेत.
हे उत्पादकांनी किमती वाढविल्याने घडले नाही. तर व्यापारी आणि किरकोळ दुकानदारांनी सवलती कमी केल्याने वस्तूंच्या किमती वाढल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. काही दुकानदारांनी एमआरपीपेक्षा ( कमाल विक्री किंमत) जास्त पैसे ग्राहकांकडून घेतले आहेत.
यामध्ये 72 टक्के लोकांनी पॅकेजमधील अन्न आणि किराणा मालासाठी जास्त पैसे खर्च केले आहेत.
टाळेबंदी खुली झाली असतानाही अनेक ग्राहक घरपोच किराणा माल घेत असल्याचेही सर्वेक्षणामधून दिसून आले.
किरकोळ विक्रेत्यांपेक्षा ई-कॉमर्स ॲपमध्ये एमआरपी नियमांचे पालन केले जात असल्याचे ग्राहकांनी म्हटले आहे.
टाळेबंदीचे नियम झाल्यानंतरही 28 टक्के ग्राहक हे पॅकेज फूड आणि किराणा माल घरपोच घेत आहेत. यामागे कोरोनाचा संसर्ग टाळणे हा ग्राहकांचा हेतू आहे.