जळगाव - टाळेबंदीत अनेक व्यवसायावर परिणाम झाला आहे. असे असले तरी गेल्या दोन महिन्यांत मास्क विक्रीच्या व्यवसायात ३० लाखांची उलाढाल झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यात सॅनिटायझर व मास्क हे सध्या गरजेचे ठरत असल्याने बाजारपेठेत हा बदल झाला आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने याबाबत प्रशासनही दक्षता घेत आहे. नागरिकांना मास्क लावण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
हेही वाचा-'भारताचा विकासदर पुन्हा ५ टक्क्यांनी पुढील वर्षात वधारेल'
अशी आहे मास्कची मागणी-
- एन- ९५ मास्कचे दर ८० ते ८०० रुपयांपर्यंत आहेत. कोरोनाच्या वातावरणात सर्वाधिक परिणामकारक अशा एन-९५ या मास्कला नागरिकांकडून पसंती मिळत आहे.
- एन ९५ हे मास्क वेगवेगळ्या किंमतीत उपलब्ध आहेत. यात एन ९५ फिल्टर मास्क व सहा लेअर असलेले मास्क सुमारे २५० रुपयांपासून तर ८०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
- सर्जिकल मास्क हे वापरून फेकता येतात. त्याच्या किंमती कमी असल्याने सर्वसामान्य नागरिक त्याचा वापर करतात.
- कापडी मास्क किंवा सर्जिकल मास्क हे गर्दीच्या ठिकाणी वापरणे योग्य आहे.
हेही वाचा-'राज्यांनी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज देण्यासाठी पुढे यावे'
केमिस्ट संघटनेतर्फे मास्क विक्री-
जिल्ह्यात ८० टक्के नागरिक हे मास्कच्या वापराबाबत जागरूक झाले आहेत. केमिस्ट संघटनेतर्फे गेल्या दोन महिन्यांत सुमारे १५ ते १६ लाखांचे मास्क विक्री करण्यात आले आहेत. तर इतर मेडिकल, दुकाने व घरगुती कापडी मास्कच्या विक्रीत सुमारे १३ ते १४ लाखांची उलाढाल झाली आहे.
केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे म्हणाले, मास्क नसेल तर रुमाल बांधावा. मात्र, तोंडाला काहीही न बांधता घराबाहेर पडू नये. नागरिकांनी मास्क वापरण्याची सवय केली पाहिजे. सर्व मास्क चांगले असून फक्त त्याचा वापर योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे आहे.