मुंबई - इराणच्या सैनिकाने इराणमधील अमेरिकन सैन्यतळावर हल्ला केल्यानंतर जगभरातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजार निर्देशांकात ४०० अंशाची घसरण झाली. त्यानंतर शेअर बाजार सावरला. बाजार बंद होताना निर्देशांक ५१.७३ अंशाने घसरून ४०,८१७.७४ वर स्थिरावला होता.
निफ्टीचा निर्देशांक हा २७.६० अंशाने घसरून १२,०२५.३५ वर स्थिरावला. जशी परिस्थिती स्थिर होईल, तसे बाजाराचे लक्ष तिसऱ्या तिमाहीतील वित्तीय कामगिरीवर आणि अर्थसंकल्पावर राहिल, असे जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी सांगितले.
हेही वाचा-'या' सहा सरकारी कंपन्यांत होणार निर्गुंतवणूक; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
एल अँड टीचे सर्वाधिक २.१९ टक्क्यांनी शेअर घसरले. त्यापाठोपाठ ओएनजीसी, टायटन, सन फार्मा, हिरो मोटोकॉर्प आणि इन्फोसिसचे शेअर घसरले आहेत. भारती एअरटेल, टीसीएस, अल्ट्राट्रेक सिमेंट, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर २.७४ टक्क्यापर्यंत वधारले.
हेही वाचा-'अमेरिका-इराणमधील तणावस्थितीसह कच्च्या तेलाच्या किमतीवर भारताचे लक्ष'
जगभरात सोन्याचे दर वाढले आहेत. तर जागतिक बाजारात खनिज तेलाचा दर प्रति बॅरल ०.६२ टक्क्यांनी वाढून ६८.६७ डॉलरवर पोहोचला आहे. रुपया सकाळच्या सत्रात बाजार खुला होताना २० पैशांनी घसरला होता. त्यानंतर डॉलरच्या तुलनेत ३ पैशांनी सावरून रुपया ७१.७८ वर पोहोचला. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात जीडीपी ५ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. हे जीडीपीचे प्रमाण गेल्या ११ वर्षातील सर्वात कमी आहे.