नवी दिल्ली - जेट एअरवेजच्या शेअरची सलग तिसऱ्या दिवशी घसरण सुरू राहिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित अग्रवाल यांनी मंगळवारी राजीनामे दिले आहेत. त्याचे पडसाद म्हणून जेट एअरवेजच्या शेअरची आज ५ टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे.
शेअर बाजार बंद होताना जेटचे शेअर ४.१८ टक्क्याने घसरले. त्यावेळी शेअरचे मुल्य १२३ रुपये ७० पैसे होते. दिवसभरात जेटचे शेअर हे ६.८५ टक्क्यापर्यंत घसरले होते. ही गेल्या ५२ आठवड्यातील सर्वात मोठी घसरण होती. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये जेटचे शेअर हे ५.३१ टक्क्याने घसरून १२२.०५ रुपयावर बंद झाले. मंगळवारी जेटच्या शेअरची ७ टक्के तर सोमवारी ८ टक्के घसरण झाली होती.
या अधिकाऱ्यांनीही दिले आहेत राजीनामे-
चार वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहे. आर्थिक डबघाईला आल्याने जेट एअरवेजने १७ एप्रिलपासून विमान उड्डाणे बंद केली आहेत. कंपनी सचिव कुलदीप शर्मा यांनीही मंगळवारी राजीनामा दिला होता. कंपनी सोडणे हा कठोर निर्णय होता, असे चीफ पिपल ऑफिसर राहुल तनेजा म्हणाले.
जेट एअरवेजची १४ हजार कोटींना खरेदी करण्याची दाखविली तयारी-
जेट एअरवेजची मालमत्ता विकत घेण्यासाठी डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनी आणि एसबीआय कॅप्समध्ये आज चर्चा झाली. जेट एअरवेज १४ हजार कोटीला खरेदी करण्याची तयारी डार्विन ग्रुपने दाखविली आहे. या ग्रुपकडून ऑईल आणि गॅस, हॉस्पिटिलटी अँड रिअॅल्टीसह विविध क्षेत्रात गुंतवणूक केली जाते.