मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्याने देशातील सोने दराने नवा विक्रम गाठला आहे. सोन्याच्या भविष्यातील सौद्यात (गोल्ड फ्युच्यअर) किमतीने नवा उच्चांक गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) ऑक्टोबरच्या सौद्याकरता सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार 670 रुपये आहे.
कोरोना महामारीमुळे जागतिक आर्थिक मंचावर अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) ऑगस्टमधील सौद्यासाठी सोन्याचा दर प्रति तोळा 54 हजार 199 रुपये प्रति तोळा झाला आहे. या सौद्याची मुदत बुधवारी संपत आहे.
ऑक्टोबरमधील सौद्यासाठी सोन्याचा दर प्रति तोळा 192 रुपयांनी वधारून 53 हजार 637 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस हा 1,987.95 डॉलरने वाढले आहेत. हा आंतरराष्ट्री बाजारातील सोन्याचा आजपर्यंतचा सर्वाधिक दर आहे.
चांदीच्या दरातही वाढ
अँजेल ब्रोकिंगचे डीव्हीपी अनुज गुप्ता म्हणाले, की आंतरराष्ट्रीय बाजाराचा देशातील फ्युचअर मार्केटवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सोन्याच्या दरवाढीबरोबर एमसीएक्समध्ये सप्टेंबरमधील चांदीच्या सौद्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या चांदीचा दर प्रति किलो 836 रुपयांनी वाढून 65 हजार 820 रुपये झाला आहे. गुंतवणूक आणि औद्योगिक क्षेत्रामधून चांदीची मागणी वाढली आहे.
चांदीच्या दरवाढीचे हे आहे कारण-
दरम्यान, चांदीचे जगात दुसऱ्या क्रमांकावर उत्पादन घेणाऱ्या पेरुमधील खाणींमधून चांदीचा कमी पुरवठा होत आहे. त्यामुळे चांदीचे जगातील उत्पादन घसरले आहे. जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूजीसी) महामारीच्या काळात सोन्याची मागणी कमी झाल्याचे म्हटले होते.