नवी दिल्ली - एनडीए सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या निधीत वाढ झाली आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मे महिन्यात ९ हजार ३१ कोटी रुपये भांडवली बाजारात गुंतविले आहेत.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआय) सलग तीन महिने शेअरची विक्री केली होती. मात्र निवडणुकीचे निकाल जाहीर होताना मे महिन्यात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मोठी गुंतवणूक केली आहे.
यापूर्वी अशी केली होती विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुंतवणूक-
- एप्रिल - १६ हजार ९३ कोटी
- मार्च- ४५ हजार ९८१ कोटी
- फेब्रुवारी - ११ हजार १८२ कोटी
२ मे ते १७ मे दरम्यान विदेशी गुंतवणूकदारांनी ६ हजार ३९९ कोटी रुपये भांडवली बाजारातून काढून घेतले होते. निवडणुकीच्या निकालापूर्वी विदेशी गुंतवणुकादाराच्या निधीचे प्रमाण अस्थिर होते. मात्र बहुमतामध्ये एनडीए सरकार आलेले निकाल जाहीर झाल्यानंतर गुंतवणुकीचे प्रमाण वाढल्याचे फंड्स इंडियाचे मुख्य संशोधक विद्या बाला यांनी सांगितले. अर्थसंकल्प आणि सरकारचे धोरण ही आगामी काळातील गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे मुद्दे असतील, असेही त्यांनी सांगितले.