राजकोट – चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेचा गुजरातमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. राजकोटमध्ये उत्पादित होणाऱ्या भारतीय खेळण्यांच्या मागणीत वाढ झाली आहे.
आदिती टॉयजचे सहसंचालक अरविंद जाला यांनी खेळण्यांच्या बाजारपेठेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, की जवळपास 80 ते 90 टक्के खेळणी चीनमधून आयात करण्यात येतात. सध्या स्वदेशी खेळण्यांना मागणी वाढत असल्याने देशातील खेळणी उद्योगांना चांगली संधी आहे. खेळणी निर्यात करून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, की येत्या दोन-तीन महिन्यात आम्ही 100 विविध उत्पादने घेवू, अशी आम्हाला आशा आहे. तर वर्षभरात 200 हून अधिक विविध उत्पादने घेणार असल्याचे जाला यांनी सांगितले. या उत्पादनांमुळे देशातील बाजारपेठेच्या गरजेची पूर्तता होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. खेळणी उद्योगात इतर क्षेत्रांच्या तुलनेने कमी स्पर्धा आहे. मात्र, रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. चीनी मालावर बहिष्कार टाकण्याची नागरिकांमधून मागणी होत आहे. त्यामुळे सध्या, भारतीय उत्पादनांची मागणी वाढल्याचे उद्योजक सुभाष जाला यांनी सांगितले.
दरम्यान, 15 जूनला पूर्व लडाखमध्ये चीनी सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवानांना वीरमरण आले आहे. त्यांनतर चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकून चीनला धडा शिकवावा, अशी भावना व्यक्त होत आहे.