नवी दिल्ली - सरत्या वर्षात कांद्याचे दर प्रति किलो २०० रुपयापर्यंत पोहोचले आहे. तर मागील तिमाहीत टोमॅटोचे दर मागील तिमाहीत वाढले होते. गेल्या तीन वर्षात किरकोळ बाजारपेठेत महागाईने उच्चांक गाठला आहे.
रोजच्या दैनंदिन जीवनात खाण्यात येणारे टोमॅटो, कांदे आणि बटाटे (Tomato, Onion & Potato ) महागल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. या भाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या राज्यांना पावसाचा फटका बसल्याने बाजारपेठेत मालाची कमी आवक होत आहे. मान्सूनमध्ये आणि मान्सूननंतर टोमॅटोचा दर प्रति किलो ८० रुपयापर्यंत पोहोचला होता. बटाट्याचे दरही डिसेंबरमध्ये ३० रुपये किलोपर्यंत पोहोचले.
हेही वाचा-सणाच्या तोंडावर कांद्यापाठोपाठ महागले टोमॅटो; गृहिणींचे बजेट कोलमडणार
किरकोळसह घाऊक बाजारपेठेत महागाई-
वार्षिक महागाई दराच्या तुलनेत घाऊक बाजारपेठेतील महागाई नोव्हेंबरमध्ये ०.५८ टक्क्यांनी वाढली. सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या महागाईने नोव्हेंबरमध्ये उच्चांक गाठल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. किरकोळ बाजारपेठेतील महागाईची नोव्हेंबरमध्ये ५.५४ टक्के नोंद झाली आहे. किरकोळ बाजारपेठेतील ही महागाई गेल्या ३ वर्षातील सर्वाधिक आहे.
हेही वाचा-भाजीपाल्यांचे भाव भिडले गगनाला; गृहिणींचे बजेट कोलमडले
कांद्याचे दर कडाडले-
देशातील बहुतांश शहरात १०० किलो प्रति दराने कांदा विकला जात आहे. तर काही शहरात कांद्याचे दर प्रति किलो १६० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी सरकारी संस्था असलेली एमएमटीसीने ४९ हजार टन कांदा आयातीचे कंत्राट दिले आहे. केंद्र सरकारने १ लाख टन कांदा आयातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
तुर्की, इजिप्त आणि अफगाणिस्तानामधून कांदा आयात करण्यात आलेला आहे. या आयातीनंतर देशातील बाजारपेठेत कांद्याचा मुबलक साठा होईल, अशी अधिकाऱ्याने अपेक्षा व्यक्त केली. यापूर्वी कांद्याचे दर वाढले असताना सरकारने २०१५-१६ मध्ये १ हजार ९८७ टन कांद्याची आयात केली होती.