मुंबई - भारत आणि आशियाचा दुसरा क्रमांकाचे श्रीमंत असलेल्या उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी उद्योग समुहाला शेअर बाजारात मोठा फटका बसला आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने कंपनीच्या अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन विदेशी फंडांची खाती गोठविल्याच्या रिपोर्टमुळे हा फटका बसला आहे. अदानी समुहाच्या या 4 कंपन्यांमध्ये 43,500 कोटींपेक्षा जास्त शेअर्स आहेत. गौतम अदानी यांनी कंपन्यांची खाती गोठविल्याचे वृत्त फेटाळले आहे.
हेही वाचा - जीएसटी परिषद : कोरोनाची 'ही' औषधे व उपकरणे होणार स्वस्त; लशीचे दर कायम
काय आहे तज्ज्ञांचे मत-
बाजार विश्लेषक पंकज जयस्वाल म्हणाले, की गेल्या वर्षी गुंतवणुकदारांची ओळख पटविण्यासाठी सेबीने केवायसीचा नियम लागू केला होता. त्यामधून गुंतवणूदार कोण आहे, कुठला आहे, याची माहिती कळू शकेल हा हेतू होता. अदानी ग्रुपमधील तीन गुंतवणूकदार असे होते, की त्यांची गुंतवणूक ४५ हजार कोटी रुपयांची होती. मात्र, त्यांची वेबसाईट नसल्याने केवायसी प्रक्रिया अपूर्ण होती. केवायसीसाठी वेबसाईट असणे ही सेबीची किमान अट होती. या अटीचे पालन केले नसल्याने सेबीने या कंपन्यांना निगराणीखाली ठेवले. केवायसी पूर्तता नसल्याने सेबीची देखरेख असल्याचे वृत्त हे अफवेत रुपांतरित होऊन बाजाराचे मोठे नुकसान झाले. तसेच गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. अदानी यांनी वृत्त फेटाळल्याने पुन्हा कंपन्यांचे शेअर वधारल्याचे जयस्वाल यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-...म्हणून कोव्हॅक्सिनला अमेरिकेकडून नाही मिळाली मंजुरी
अदानी यांनी खाती गोठविल्याचे फेटाळले वृत्त
अब्जाधीश गौतम अदानी यांनी तिन्ही कंपन्यांचे खाती गोठविल्याचे वृत्त फेटाळले आहे. खाती गोठविल्याचे रिपोर्ट स्पष्टपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचा त्यांनी दावा केला आहे. एनएसडीएलने अदानी ग्रुपच्या मालकीच्या तीन कंपन्यांची खाती गोठविल्याचे रिपोर्ट आले होते. त्या वृत्तानंतर अदानी ग्रुपच्या शेअरला सोमवारी मोठा फटका बसला आहे. अदानी एन्टरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनिमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी पावर आणि अदानी टोटल गॅसने शेअर बाजाराला माहिती दिली आहे. या माहितीत तिन्ही कंपन्यांची खाती गोठविण्याचे रिपोर्ट हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. चुकीच्या रिपोर्टमुळे गुंतवणुकदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आणि ग्रुपच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसल्याचे कंपन्यांनी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
अदानी ग्रुपचे चेअरमन हे संपत्ती वाढण्यात जगात प्रथम-
अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी हे चालू वर्षात संपत्तीत वाढ होण्यामध्ये पहिल्या क्रमांकाचे उद्योगपती ठरले आहेत. गुंतवणुकदारांनी कंपन्यांमध्ये अधिक गुंतवणूक केल्याने त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सकडून जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीच्या आकडेवारीची दैनंदिन माहिती घेतली जाते. या माहितीप्रमाणे अदानी यांच्या एकूण संपत्तीत १ जानेवारी २०२१ पासून १६.२ अब्ज डॉलरची (सुमारे १.२ लाख कोटी) वाढ झाली आहे.