दावोस - गरीब आणि श्रीमंतामधील भीषण असमानता दाखविणारी आकडेवारी समोर आली आहे. भारतामधील १ टक्के श्रीमंताकडे असलेली संपत्ती ही देशातील लोकसंख्येच्या ७० टक्के असलेल्या ९५.३ कोटी लोकांहून चारपट अधिक आहे. तर देशातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती ही भारताच्या वार्षिक अर्थसंकल्पाहून अधिक आहे. ही माहिती अभ्यासातून समोर आली आहे.
जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्ल्यूईएफ) ५० व्या वार्षिक बैठकीच्या तोंडावर ऑक्सफॅम या संघटनेने समाजातील विषमतेची आकडेवारी दाखवून दिली आहे. जगामध्ये २ हजार १५३ अब्जाधीश आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही जगातील ६० टक्के लोकसंख्या असलेल्या ४.६ अब्ज लोकांहून अधिक आहे.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प छपाईसाठी होणार रवाना; 'ही' आहे अनोखी परंपरा
गेल्या दहा वर्षात अब्जाधीशांची संख्या वाढल्याबरोबर जागतिक विषमता वाढल्याची धक्कादायक माहिती ऑक्सफॅमच्या अहवालातून समोर आली आहे. गरीब आणि श्रीमंतामधील दरी ही वारंवार होणाऱ्या असमान धोरणातून कमी होवू शकत नाही. केवळ काही सरकारांनीच याबाबत बांधिलकी दाखविल्याचे ऑक्सफॅम इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बेहर यांनी म्हटले आहे. ते ऑक्सफॅमच्या वार्षिक बैठकीत बोलत होते.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी कपात; जाणून घ्या आजचे दर
जागतिक आर्थिक मंचाच्या पाचदिवसीय परिषदेत उत्पन्नाची समस्या आणि लिंग समानता यावर प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. जागतिक आर्थिक मंचाने 'जागतिक वार्षिक जोखमी'वरील अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेवरील वित्तीय असमानतेची जोखीम २०१९ मध्ये कायम राहिल्याचे म्हटले आहे.
सामाजिक असमानतेचा प्रश्न जागतिक आर्थिक मंचाच्या अहवालात अधोरेखित करण्यात आला आहे. या अहवालात भ्रष्टाचार, घटनेचे उल्लंघन आणि वस्तू आणि सेवा करांच्या वाढण्या किमती यावर चिंता व्यक्त करण्यात आले आहे.