नवी दिल्ली - आरोग्यवर्धक आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी अधिक स्निग्धपदार्थ, साखर आणि मीठ असलेल्या पदार्थांवर जास्त कर लावावा, अशी अपेक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केली. त्या एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनमध्ये बोलत होत्या. सौम्या या जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ आहेत.
डॉ. सी. गोपालन यांना 'भारतीय पोषण संशोधनेचे पितामह' म्हणून ओळखले जाते. त्यांचे गतवर्षी निधन झाले. ते राष्ट्रीय पोषण संस्थेचे माजी संचालक होते. त्यांच्या स्मरणार्थ डॉ. सी. गोपालन स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या, वाढते वजन आणि लठ्ठपणाने पोषणात अडथळा येतो. या समस्येवर आपण त्वरीत तोडगा काढायला पाहिजे.
हेही वाचा-पायाभूत समस्यांवर मात केल्याने मिळू शकते अर्थव्यवस्थेला चालना
कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कुपोषण आणि कमतरतेच्या समस्या असल्याचे आपल्याला नेहमी वाटते. मात्र, या समस्या मध्यम उत्पन्न असलेल्या देशात व समाजातही असतात ही नव्याने कळालेली वस्तुस्थिती आहे. हीच परिस्थिती जगभरात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा-मध्यपूर्वेतील तणावाने पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच
जगभरात २.३ अब्ज प्रौढ आणि मुलांना अधिक वजनाची समस्या आहे. तर १५० दशलक्ष मुलांच्या शारीरिक विकासात अडथळा आला आहे. अधिक वजन असणे आणि लठ्ठपणा ही समस्या वेगाने वाढत आहे. ही समस्या कायम राहिली तर भविष्यातील पिढ्यांना दीर्घकाळासाठी परिणामांना भोगावे लागेल. अपायकारक अन्नावर कर लावणे आणि पोषणमुल्यांची माहिती देणे बंधनकारक केल्याने या समस्येवर मात करण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी केंद्र सरकारला ८ धोरणात्मक उपायही सूचविले आहेत.