नवी दिल्ली - आयएल अँड एफएस प्रकरणात पाच पतमानांकन संस्थांनी काय भूमिका बजावली आहे, याचा बाजार नियंत्रक सेबी सखोल तपास करणार आहे. आएल अँड एफएसच्या नव्या संचालक मंडळाने फॉरेन्सिक लेखापरीक्षण केल्यानंतर सेबीने हा निर्णय घेतला आहे. पतमानांकन संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी आयएल अँड एफएसला मानांकन देताना दोषी असल्याचा सेबीला संशय आहे.
सेबीने चौकशी सुरू केल्याने दोन पतमानांकन संस्थांनी आपल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविले आहे. आयएल अँड एफएसला मानांकन देताना पतमानांकन संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक योग्य प्रक्रिया डावलण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.
आयएल अँड एफएसचे ग्रँट थॉर्नटोन या कंपनीने विशेष लेखापरीक्षण केले आहे. या कंपनीने पतमानांकन संस्थांच्या वरिष्ठ अधिकारी व आयएल अँड एफएसमध्ये करण्यात आलेले ई-मेल मिळविले आहेत. त्यामधून पतमानांकन संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आयएल अँड एफएसच्या नाजूक आर्थिक परिस्थितीची माहिती होती, हे दिसून आले आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये आयएल अँड एफएसच्या नव्या संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीने ९० हजार कोटींहून अधिक कर्ज थकविले आहे.
आयएल अँड एफएसला चांगले मानांकन देणाऱ्या संस्थांमध्ये क्रिसील, केअर रेटिंग्ज, इक्रा, इंडिया रेटिंग्ज आणि ब्रिकवर्क या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, या पतमानांकन संस्थांच्या अधिकाऱ्यांनी त्रुटी राहिल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. अंतरिम अहवालात मानांकन करण्याच्या प्रक्रियेची मर्यादित आणि एकांगी माहिती असल्याचा दावाही पतमानांकन संस्थांनी केला आहे.
पतमानांकन संस्थांचे काय असते काम ?
पतमानांकन संस्था कंपन्यांना वित्तीय कामगिरी आणि जोखीमबाबत माहिती देतात. तसेच त्यानुसार मानांकन जाहीर करतात. कंपन्यांना चांगले पतमानाकंन मिळाल्यास त्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. कारण चांगले पतमानांकन म्हणजे गुंतवणुकदारांचा विश्वास आणि कर्ज घेण्याची पत याचे निर्देशक मानले जाते. आर्थिक परिस्थिती खराब असतानाही आयएल अँड एफएसला चांगले मानांकन दिल्याने संबंधित ५ संस्था सेबीच्या रडारवर आल्या आहेत.