नवी दिल्ली - ओपेकने कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. भारत सरकारने सौदी अरेबियाला कच्च्या तेलाचे दर नियंत्रित करण्याची विनंती केली आहे. त्यावर सौदी अरेबियाने भारताला गतवर्षी कमी दरात खरेदी केलेले कच्चे तेल वापरण्याचा सल्ला दिला आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर शुक्रवारी १ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ६७.४४ डॉलर आहेत. मागणीत वाढ होईपर्यंत ओपेक आणि ओपेक प्लस या संघटनांनी एप्रिलमध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजार निर्देशांकात दिवसाखेर ४४० अंशांची घसरण
- देशाचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी उत्पादनात वाढ करावी, अशी उत्पादक गटाला विनंती केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने अर्थव्यवस्था सावरण्याला आणि मागणीला झळ बसत आहे.
- भारताने केलेल्या विनंतीबाबत सौदीचे उर्जामंत्री राजकुमार अब्दुलअझीझ बिन सलमान म्हणाले की, नवी दिल्लीने त्यांच्याकडी काही साठ्यांचा वापर करावा. हा साठा त्यांनी गतवर्षी अत्यंत कमी किमतीत खरेदी केला आहे.
- देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे दरवाढीचा भार हा सरकारी तेल कंपन्यांकडून ग्राहकांवर ढकलला जात आहे.
- दरम्यान, येत्या काही आठवड्यात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पाँडेचरी आणि आसाममध्ये निवडणुका पार पडणार आहेत.
- नुकतेच पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले होते की, देशातील कच्च्या तेलाची मागणी ही कोरोनापूर्वीच्या काळाइतकी होत आहे. त्यामुळे वाजवी व जबाबदारीच्या स्वरुपात कच्च्या तेलाच्या किमती असणे आवश्यक आहे.
हेही वाचा-इंधनावरील करात कपात करूनही केंद्राचे महसूल उद्दिष्ट होऊ शकते पूर्ण
दरम्यान, भारत हा कच्च्या तेलाचा जगभरातील तिसऱ्या क्रमांकाचा आयातदार आणि ग्राहक देश आहे. कोरोनाच्या काळात मागणी कमी झाली असताना कच्च्या तेलाचे कमी उत्पादन करण्यासाठी भारताने तेल उत्पादक देशांची संघटना कार्टेल ओपेकला समर्थन दिले होते.