मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सलग दुसऱ्यांदा रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. आरबीआयने रेपो दर हा ४ टक्के ठेवण्याचा निर्णय दास यांना पतधोरण समितीच्या तीन दिवसीय पत्रकार परिषेदत आज जाहीर केला आहे.
आरबीआयच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज पार पडली आहे. या बैठकीनंतर पतधोरण समितीचे अध्यक्ष शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले आहे. आरबीआयचे रेपो दर ४ टक्के व रिव्हर्स रेपो दर हा ३.५ टक्के पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आर्थिक विकासदराला चालना देण्यासाठी आरबीआयच्या पतधोरण समितीने लवचिक धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे पतधोरण समितीने रेपो दर स्थिर ठेवल्याची माहिती दास यांनी दिली. चालू आर्थिक वर्षात विकासदार ९.५ टक्के घसरण होईल, असा अंदाज दास यांनी व्यक्त केला.
कोरोनाविरोधातील लढ्यात देशाची अर्थव्यवस्था निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे शक्तिकांत दास यावेळी म्हणाले. चालू वर्षाच्या तिमाहीत महागाईचा दर अधिक असेल, असेही आरबीआयचे गव्हर्नर यावेळी म्हणाले. पतधोरण समितीच्या बैठकीला नवीन तीन सदस्य अशिमा गोयल, जयंत आर. वर्मा आणि शशांक भिडे हे उपस्थित होते.
दरम्यान, चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी हा २३.९ टक्के घसरल्याचे केंद्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे. कोरोना महामारी आणि टाळेबंदीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.