नवी दिल्ली - अतिश्रीमंतावरील अधिभार (सरचार्ज) व गृहनिर्माणसह वाहन उद्योगामध्ये मंदी अशा समस्या अर्थव्यवस्थेसमोर आहेत. याबाबत उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून वित्त मंत्रालयाच्या सचिवासह इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार चर्चा करत असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा हे वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांची आज बैठक घेणार आहेत. या बैठकीत वित्त मंत्रालयाकडून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपाय सुचविले जाणार आहेत. विदेशी गुंतवणूकदार संस्थांवर अधिभार लागू होणार असल्याने भांडवली बाजारावर परिणाम होत आहे. याबाबतही बैठकीत चर्चा केली जाणार आहे. आर्थिक पॅकेजबाबत वित्त मंत्रालयाचे अधिकारी पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा करणार असल्याचे सीतारामन यांनी शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सांगितले होते.
काय म्हणाल्या होत्या सीतारामन-
बँकांचे प्रतिनिधी करणारे विविध पाच गट आणि वित्तीय संस्था, एसएमई उद्योग, वाहन उद्योग आदींच्या समस्या सोमवारपासून जाणून घेतल्या आहेत. सरकारने काय पावले उचलायला पाहिजेत, याबाबत सरकारकडून विश्लेषण करण्यात येत असल्याचे सीतारामन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. पंतप्रधांनाशी अर्थव्यवस्थेबाबत गुरुवारी (१५ ऑगस्ट) बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले होते.