इस्लामाबाद - भारताने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानचा अजूनही जळफळाट सुरू आहे. पाकिस्तानने भारतीय चित्रपटांच्या सीडीवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक माध्यम नियंत्रण प्राधिकरणाने (पेम्रा) भारतीय कलाकार असलेले आणि भारतात तयार झालेल्या उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी घातली आहे.
भारतीय जाहिरातींवर घातलेली बंदी आणि भारतीय सीडी विकणाऱ्या दुकानांवर केलेल्या कारवाईचे वृत्त पाकिस्तानी माध्यमाने दिले आहे. इस्लामाबादमध्ये भारतीय चित्रपटाच्या सीडी विकणाऱ्या दुकानावर कारवाई करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या पतंप्रधानांचे विशेष सहायक फिरदोस आशिक आवान यांनी म्हटले. ही कारवाई आणखी व्यापक करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सीडी विकणाऱ्या दुकानांवर छापे टाकले आहेत. पेम्रा संघटनेने भारतीय जाहिरातींवर बंदी घालण्यात येणारे परिपत्रक १४ ऑगस्टला काढले आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्याचे उत्पादन भारतामध्ये होत असते. तसेच अनेक कलाकार बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जाहिरातीमध्ये काम करतात. अशा जाहिरातींवर बंदी आणल्याचे पेम्राने परिपत्रकात म्हटले आहे.
या कंपन्यांच्या जाहिरातींवर पाकिस्तानने घातली बंदी-
डेटॉल सोप, सर्फ एक्सेल पावडर, पँटिन शाम्पू, हेड अँड शोल्डर्स शाम्पू, लाईफबॉय शाम्पू, फॉग बॉडी स्प्रे, सनसिल्क शाम्पू, फेअर अँड लव्हली फेस वॉश या उत्पादनांच्या जाहिराती बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी पाकिस्तानने भारतीय प्रसारमाध्यमांचे परवाने रद्द केले आहेत. जम्मू आणि काश्मीर हा देशांतर्गत मुद्दा असल्याचे भारताने ठामपणे जागतिक समुदायाला सांगितले आहे.