नवी दिल्ली - नव्या सरकारने कॉर्पोरेट कर हा ५ टक्क्यांनी कमी करावा, असे अर्थतज्ज्ञ सुरजीत भल्ला यांनी म्हटले आहे. येत्या तीन वर्षात किमान आधारभूत किंमतची यंत्रणा (एमएसपी) रद्द करून कृषी क्षेत्रात सुधारणा करावी, अशी अपेक्षा भल्ला यांनी व्यक्त केली. ते फिक्कीच्या कार्यक्रमात बोलत होते. उत्पन्न वाढविण्यासाठी मदत करण्याच्या योजनेचा विस्तार करावा, असेही भल्ला यावेळी म्हणाले.
सुरजीत भल्ला म्हणाले, देशात भांडवली खर्च आणि कॉर्पोरेट कर हा जास्त आहे. गेली ५ ते ६ वर्षे आरबीआयने चुकीचे मार्गदर्शन केल्याची त्यांनी आरबीआयच्या कारभारावर टीका केली. भारताची वार्षिक ८ ते ८.५ टक्केविकासदर गाठण्याची क्षमता असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. भल्ला यांनी पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिला होता.
विविध विषयांवर अर्थतज्ज्ञ भल्ला यांनी मांडली भूमिका-
- कृषी क्षेत्रात कोणताही हस्तक्षेप नसावा.
- अमेरिका-चीनच्या व्यापारी युद्धावर बोलताना ते म्हणाले की, चीन अनेक वर्षांपासून जागतिक अर्थव्यवस्थेचा गैरफायदा घेत आहे. या अतिरिक्त फायद्याची किंमत चीनला मोजावी लागत आहे.
- गोमांसवर बंदी घालण्याच्या धोरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर तसेच मुस्लिमांवर वाईट परिणाम होत आहे.
- मोदींनी सिंगापूरचे संस्थापक ली कुआन यू यांच्याप्रमाणे व्हिजन ठेवण्याची त्यांनी गरज व्यक्त केली.