मुंबई - ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाख रुपयांहून अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना दिलासा देणारी एकरकमी कर्ज परतफेड योजना अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केली. २ लाखांहून अधिक कर्ज असेल तर एकरकमी परतफेडीतून शेतकऱ्याला ५० हजार रुपयापर्यंत सवलत मिळणार आहे.
महाविकासआघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला. ज्या शेतकऱ्यांनी २०१८-१९ मध्ये नियमितपणे पीक कर्जाची परतफेड केली आहे, त्यांना ५० हजार रुपयांची सवलत दिली जाणार आहे. यापूर्वी राज्य सरकारने दोन लाख रुपयापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची महात्मा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे.
हेही वाचा-येस बँकेवरील आर्थिक संकटानंतर महाराष्ट्र सरकारने 'हा' घेतला मोठा निर्णय
मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या आव्हानांवर मात करत रोजगार निर्मिती करण्यावर अर्थसंकल्पात तरतुदी केल्याचे पवार यांनी सांगितले. शिवभोजन योजनेमधून १ लाख लोकांना जेवण देण्याचे सरकारने उद्दिष्ट निश्चित केले आहे. सवलतीच्या दरात अन्न मिळण्यासाठी सरकारने १५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाविकासआघाडी सरकारने शुक्रवारी १०० दिवस पूर्ण केली आहे. राज्य सरकारवर जानेवारी २०२० पर्यंत ४ लाख ३३ हजार ९०१ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा-येस बँकेवरील संकटावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया